मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:01 IST2025-10-16T15:00:56+5:302025-10-16T15:01:30+5:30
Mumbai Crime News: सुमारे ४८ वर्षांपूर्वी १९७७ साली महिलेवर चाकू हल्ला करणाऱ्या आणि या प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर पोलीस आणि कोर्टाच्या हातावर तुरी देत कोकणात जाऊन लपलेल्या एका आरोपीला पोलिसांनी तब्बल ४८ वर्षांनंतर शोधून काढलं आहे.

मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
सुमारे ४८ वर्षांपूर्वी १९७७ साली महिलेवर चाकू हल्ला करणाऱ्या आणि या प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर पोलीस आणि कोर्टाच्या हातावर तुरी देत कोकणात जाऊन लपलेल्या एका आरोपीला पोलिसांनी तब्बल ४८ वर्षांनंतर शोधून काढलं आहे. आरोपीच्या नावाशिवाय हाती काहीच धागादोरा नसताना पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केवळ नावावरून आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.
चंद्रशेखर कालेकर असं या अटक करण्यात आलेल्या आऱोपीचं नाव आहे. तो मुंबईतील लालबाग परिसरात वास्तव्यास होता. दरम्यान, १९७७ साली काही किरकोळ वादातून त्याने एका महिलेवर हल्ला करून चाकूने सपासप वार केले होते. या प्रकरणी त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच पोलिसांनीही त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. मात्र कोर्टातून जामीन मिळाल्यावर तो पसार झाला होता. तसेच पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी सांताक्रुज, गोरेगाव, माहीम, लालबाग, बदलापूर असे वास्तव्याचे ठिकाण बदलत फिरत राहिला. अखेरीस तो कोणातील दापोलीजवळील एका गावी जाऊन राहिला.
यादरम्यान, आरोपी तारखांना हजर राहत नसल्याने कोर्टाने त्याला फरार घोषित केले. तसेच आरोपी राहत असलेली हाजी कासम चाळ तुटल्याने केवळ नावाशिवाय काहीच पुरावा हाती नसल्याने पोलिसांनी हळूहळू या प्रकरणाचा तपास बंद केला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला. मात्र आरोपीच्या नावाव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच नव्हतं. पण पोलिसांनी हिंमत न हरता तंत्रज्ञानाची मदत घेत आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.
त्यासाठी पोलिसांनी निवडणूक आयोगाचं पोर्टल आणि आरटीओ विभागाच्या पोर्टलवर चंद्रशेखर मधुकर कालेकर नाव शोधलं. त्यातून चंद्रशेखर मधुकर कालेकर नावाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ एकच मतदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच चंद्रशेखर कालेकर ही व्यक्ती रत्नागिरीमधील दापोली येथे रहाणारी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी थेट दापोली पोलीस ठाण्यात जात माहिती घेतली. तिथून या नावाच्या एका व्यक्तीवर २०१५ साली एक अपघाताचा गुन्हा नोंद असल्याचे कळले. तसेच आरटीओ ऑफिसमधून त्याचं लायसन आणि फोटो मिळाला.
या फोटोची शहानिशा केल्यानंतर पोलीस थेट आरोपीच्या घरी धडकले. एवढ्या वर्षांनंतर आपल्याला पोलीस पकडण्यासाठी येतील याची कल्पनाही नसल्याने पोलिसांना पाहून आरोपीला धक्काच बसला. तसेच ४८ वर्षांपूर्वी वयाच्या २३ व्या वर्षी केलेला गुन्हाही त्याला आठवेना, अखेरीस पोलिसांनी त्याने केलेल्या गुन्ह्याची सगळी माहिती त्याच्यासमोर ठेवली. तेव्हा आरोपीने गुन्हा कबूल केला. मग पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केलं असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.