६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:58 IST2025-10-13T19:55:07+5:302025-10-13T19:58:11+5:30
MSRTC Employee: राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ८५ हजार कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ८५ हजार कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपयांचा बोनस आणि वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला . या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ट्रिपल बेनिफिट’
१) बोनस: सर्व ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ६ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे.
२) थकबाकी: सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम आता कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत दिली जाणार आहे. यासाठी शासनाने दरमहा ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
३) अग्रीम (उचल): सण अग्रीम घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये इतका अग्रीम पूर्वीप्रमाणेच देण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
🗓 १३ ऑक्टोबर २०२५ | 📍 मुंबई
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 13, 2025
एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट
एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र… pic.twitter.com/fkh63KLILW
एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यावर भर: एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, यावर भर दिला. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध करणे गरजेचे आहे. यासाठी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.