मराठी न बोलल्याने हॉटेल मालकाला दिला चोप, मनसेच्या ७ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल; घटनेवर भाजपचं ट्वीट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:08 IST2025-07-02T12:06:59+5:302025-07-02T12:08:24+5:30
महाराष्ट्रात मराठी विरूद्ध हिंदी असा वाद सुरु असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठी न बोलल्याने हॉटेल मालकाला दिला चोप, मनसेच्या ७ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल; घटनेवर भाजपचं ट्वीट!
महाराष्ट्रात मराठी विरूद्ध हिंदी असा वाद सुरु असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉटेल मालकाला मराठीत न बोलल्याने मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या घटनेवर भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मराठीचा अभिमान, पण माणुसकीच्या मर्यादा विसरून नाही, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी रात्री १०:३५ वाजताच्या सुमारास काही मनसे कार्यकर्ते मीरा रोड पूर्वेकडील शांती पार्क परिसरातील बालाजी हॉटेलजवळील 'जोधपूर स्वीट्स अँड नमकीन' नावाच्या मिठाईच्या दुकानात शिरले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी हॉटेल मालक सुभाष चौधरी यांना ग्राहकांशी मराठीत संवाद साधण्याची मागणी केली. परंतु, सुभाष यांनी त्यांच्या दुकानात अनेक भाषिक लोक येतात, त्यानुसार त्यांच्याशी संवाद साधला जातो, असे मनसे कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र, त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सुभाष यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी हॉटेल मालक सुभाष चौधरी यांनी काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुभाष यांनी आपल्या तक्रारीत स्पष्टपण म्हटले आहे की, मला मराठी भाषेचा आदर आहे. परंतु जबरदस्तीने भाषा लादणे चुकीचे आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मनसेच्या सात कार्यकर्त्यांविरोधात भारतीय दंड संहिताच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
भाजपची प्रतिक्रिया
या घटनेवर भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. "मिरा-भाईंदर परिसरात एका जैन/मारवाडी समाजातील व्यापाऱ्यास त्याने मराठी भाषेत संवाद साधण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करण्यात आली, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा भाग आहे. मराठीचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे – परंतु तो प्रेमाने, समजुतीने आणि सहिष्णुतेने व्हायला हवा."
"मराठीचा अभिमान, पण माणुसकीच्या मर्यादा विसरून नाही!"
— Narendra Mehta (@iNarendraMehta) June 30, 2025
मिरा-भाईंदर परिसरात एका जैन/मारवाडी समाजातील व्यापाऱ्यास त्याने मराठी भाषेत संवाद साधण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करण्यात आली, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा… pic.twitter.com/CvLinfvmFt
पुढे मेहता म्हणाले की, "मनसेच्या कार्यकर्त्यांकडून घडलेली ही हिंसक घटना केवळ एका व्यक्तीच्या भाषेच्या निवडीवरून त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आघात करते आणि महाराष्ट्राच्या सहिष्णु परंपरेला धक्का देते. मी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो आणि संबंधित यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, ही माझी स्पष्ट भूमिका आहे", असे ते म्हणाले.