उद्धवसेनेच्या कोट्यातून मनसेला हवे 'स्वीकृत' पद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 07:05 IST2026-02-07T07:03:39+5:302026-02-07T07:05:06+5:30
वरिष्ठ नेते करणार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा; नंतरच होणार अंतिम निर्णय

उद्धवसेनेच्या कोट्यातून मनसेला हवे 'स्वीकृत' पद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: महापालिकेत महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी शनिवारी ७ फेब्रुवारीला अर्ज दाखल केले जाणार आहेत. महापौर कोण होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले असतानाच स्वीकृत नगरसेवकपदावरून मनसेची नवी भूमिका समोर आली आहे. उद्धवसेनेच्या कोट्यातून मनसेला एक स्वीकृत नगरसेवकपद देण्यात यावे, अशी मागणी मनसेचे पालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. या संदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतील, असेही त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे लढविली. उद्धवसेनेने १६३, तर मनसेने ५३ जागा लढविल्या. यात उद्धवसेनेचे ६५, तर मनसेचे ६ उमेदवार निवडून आले. मनसेच्या हक्काचे मतदार असलेल्या काही जागा
उद्धवसेनेसाठी सोडण्यात आल्या होत्या. उद्धवसेनेचे नगरसेवक निवडून येण्यामध्ये मनसेचा मोठा हातभार आहे. मुंबई महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असून, संख्याबळानुसार भाजपला ४, उद्धवसेनेला ३ तर शिंदेसेना, काँग्रेस व एमआयएमला प्रत्येकी १ स्वीकृत नगरसेवक मिळणार आहे.
मनसेचे पालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांनी याबाबत भूमिका मांडताना सांगितले की, आमच्याकडे संख्याबळ नसल्याने आमच्या पक्षाला स्वीकृत नगरसेवक मिळणार नाही; परंतु, उद्धवसेनेच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवक येत आहेत. त्यांपैकी त्यांनी एक जागा मनसेला द्यावी, अशी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्याची भावना आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आम्ही कार्यकर्त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षाला एक स्वीकृत नगरसेवक मिळाला तर आनंदच आहे.
'त्या' बातम्या कुणाला तरी डिवचण्यासाठी
महायुतीला पाठिंबा देण्याबाबत भाजप किंवा शिंदेसेनेकडून अद्याप तरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे अशा प्रस्तावावर विचार करताच येणार नाही. मात्र, आम्हाला प्रस्ताव पाठविल्याचा बातम्या काहीजण मुद्दामहून कुणाला तरी डिवचण्यासाठी पसरवत आहेत, असा आरोपही किल्लेदार यांनी यावेळी केला.