Gajanan Kale : "पोटातलं ओठावर आलंच, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना"; 'तो' Video शेअर करत मनसेचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 15:15 IST2022-12-24T15:01:33+5:302022-12-24T15:15:39+5:30
MNS Gajanan Kale : मनसे नेते गजानन काळे यांनी खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हि़डीओ शेअर केला आहे.

Gajanan Kale : "पोटातलं ओठावर आलंच, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना"; 'तो' Video शेअर करत मनसेचा टोला
कर्नाटक सरकार, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचे निलंबन व विरोधकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी शुक्रवारी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा भरवत त्यांनी सरकारविरुद्ध आंदोलन केले. यावेळी काळ्या पट्ट्या बांधून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोमवारी जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्यास त्यांच्याकडून दबाव येऊ शकतो. सीमाप्रश्नी सोमवारी ठराव घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याच दरम्यान यावरून मनसेने निशाणा साधला आहे. मनसे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हि़डीओ शेअर केला आहे. "पोटातलं ओठांवर आलंच. राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना. आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना – जयंत पाटील... भास्कर जाधव यांनीही मान्य केलं आहेच!" असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
पोटातलं ओठावर आलंच ... राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना ...
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) December 23, 2022
“आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना " - जयंत पाटिल ...
भास्कर जाधव यांनी पण मान्य केले आहेच ... pic.twitter.com/oH0hpLEHGL
काळे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यासह जयंत पाटील माध्यमांशी बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी बोलताना जयंत पाटील यांनी "आमची शिवसेना आहे. राष्ट्रवादीची शिवसेना आहे" असं विधान केलं. त्यावर भास्कर जाधव यांनी दिलखुलासपणे हसत दाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. यावरूनच मनसेने खोचक टोला लगावला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"