मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:16 IST2025-07-14T11:15:38+5:302025-07-14T11:16:24+5:30
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
मुंबई - हिंदी सक्तीविरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय पटलावर युती करणार का याबाबत अजूनही साशंकता आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीबाबत सकारात्मकता दाखवण्यात आली असली तरी राज ठाकरे यांनी युतीवर कुणीही भाष्य करू नका असा आदेशच नेते, पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यातच मनसेचे आजपासून २ दिवसीय शिबिर नाशिकच्या इगतपुरी येथे पार पडणार आहे. या शिबिराला राज्यभरातून मनसेचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. त्याठिकाणी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या शिबिराबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, पक्षसंघटनेचे २ दिवसीय शिबिर आहे. या शिबिरात अनेक विषयांवर चर्चा केली जाईल. राजसाहेब नेते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील. पक्षातंर्गत विविध विषयांवर चर्चा होईल. मात्र शिबिरात काय मुद्दे असतील, कशावर चर्चा होईल हे आम्हाला माहिती नाही. तिथे गेल्यावर आम्हाला कळेल असं त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १६ जुलैपर्यंत हे शिबिर असणार आहे. त्यासाठी नेते, पदाधिकारी इगतपुरीत दाखल झाले आहेत.
मनसेची मोर्चेबांधणी
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक मराठी भाषा प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले. त्यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची हाक दिली. त्यामुळे मनसे-उद्धवसेना या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. हिंदी सक्तीला होणारा विरोध पाहून राज्य सरकारने याबाबत काढलेले दोन्ही जीआर मागे घेत असल्याचे घोषित केले. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले. १८ वर्षांनी पहिल्यांदाच राज आणि उद्धव एकाच व्यासपीठावर आले त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू युती होणार अशी चर्चा सुरू झाली.
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…"
दरम्यान, युतीबाबत संजय राऊत यांनी सामना रोखठोकमध्ये भाष्य केले होते. त्यावर मी संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये काय लिहिले होते, हे अजून वाचलेलं नाही. युती होणार की नाही याबाबत मला माहिती नाही. त्याबद्दल राज ठाकरे हे बोलतील. पक्षाचे प्रमुख हे आमच्यापेक्षा एक हजार फूट अधिक पुढे असतात. पक्षाचं हित कशात आहे, हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. मनसेने आतापर्यंत निवडणुका ह्या एकट्याने लढवलेल्या आहेत. त्यामुळे आताही वेळ आली तर आम्ही एकट्याने निवडणूक लढवू शकतो असं विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्याने ठाकरे बंधू युतीवर संभ्रम निर्माण झाला आहे.