आमदारकी गेली उडत,शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या : संदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 14:20 IST2021-03-06T14:06:42+5:302021-03-06T14:20:01+5:30
आमदारकी गेली उडत अगोदर शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या अशा शब्दात राज्यातील आघाडी सरकारवर हल्ला चढवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ऍड.एस.यु.संदे यांनी सांगली जिल्ह्यातील पूर्ण एफआरपी न दिलेल्या कारखान्यानी राहिलेली रक्कम व्याजासह द्यावी.यापुढे गाळप होणाऱ्या उसाची एफआरपी एकरक्कमी द्यावी या मागणीसाठी ८ मार्चला राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिषेक घालणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगितले.

आमदारकी गेली उडत,शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या : संदे
इस्लामपूर : आमदारकी गेली उडत, अगोदर शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या अशा शब्दात राज्यातील आघाडी सरकारवर हल्ला चढवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ऍड.एस.यु.संदे यांनी सांगली जिल्ह्यातील पूर्ण एफआरपी न दिलेल्या कारखान्यानी राहिलेली रक्कम व्याजासह द्यावी. यापुढे गाळप होणाऱ्या उसाची एफआरपी एकरक्कमी द्यावी या मागणीसाठी ८ मार्चला राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिषेक घालणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगितले.
संदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घेऊन एकरक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय घेत तो अंमलातही आणला.मात्र सांगली जिल्ह्यातील सोनहीरा, उदगीर आणि दालमिया हे तीन कारखाने वगळता इतर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडले.
१५ दिवसाच्या आत एफआरपी देण्याच्या कायद्याचा भंग केला आहे.त्यामुळे या कारखानदारांना सुबुद्धी सुचावी आणि शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे त्यांना त्वरित मिळावेत यासाठी कोविड आणि जमावबंदी आदेशाचे पालन करून ८ मार्चला सकाळी ११ वाजता राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्याला हा अभिषेक घालणार आहोत.
आमदारकीसाठी दबाव टाकण्यासाठी हे आंदोलन आहे का? या प्रश्नावर संदे यांनी एकदम उसळून आमदारकी गेली उडत, आम्हाला त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढणे महत्वाचे आहे.त्याच्या घामाचा दाम मिळवून देणे आमच्यासाठी आमदारकीपेक्षा मोठे आहे,असे स्पष्ट केले.यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य आप्पासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष भागवत जाधव,रमेश पाटील उपस्थित होते.