आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर, भाजपच्या आमदाराने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:51 IST2025-09-26T11:51:01+5:302025-09-26T11:51:38+5:30
'महापालिका निवडणुकीसाठी जाहीर होणाऱ्या कच्च्या मतदारयाद्या नीट तपासा, नंतर वोट चोरी झाल्याचे सांगू नका'

संग्रहित छाया
इचलकरंजी : आगामी निवडणुकीचे मतदान ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर होणार आहे, असा दावा आमदार राहुल आवाडे यांनी केला आहे. तसेच महापालिका निवडणुकीसाठी जाहीर होणाऱ्या कच्च्या मतदारयाद्या नीट तपासा, नंतर वोट चोरी झाल्याचे सांगू नका, असा टोला विरोधकांना लगावला.
इचलकरंजी येथील एका वॉर्डातील छोट्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आमच्याकडे सर्व ६५ जागांवर ताकदीचे उमेदवार आहेत. विरोधकांकडे उमेदवार नाहीत. त्यामुळे ते काही उमेदवारांना नवरा बायको असे दोघेजण वेगवेगळ्या वाॅर्डात उभे राहा असे म्हणून तयार करत आहेत. अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला सर्व जागांवर यश मिळणार आहे. त्याचे आश्चर्य वाटू नये.
वाचा- कोल्हापूर महापालिकेत आमची चाल कासवाची असेल, पण..; मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा
निकालानंतर आपल्यावर वोट चोरीचा विरोधक आरोप करतात. पण यावेळी मतदान हे आता मशीनवर न होता बॅलेटपेपरवर होणार आहे. त्यामुळे मशीन मॅनेज केल्याचा विरोधकांचा आरोप होणार नाही.
सद्या त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते पाण्याच्या प्रश्नावर ते आरोप करीत आहेत.परंतु आमचे काम सुरू आहे. लवकरच पंचगंगा नदीतून २५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. तसेच शहरात पाणी साठा करण्यासाठी सहा जलकुंभ उभारण्यात येत आहेत. या माध्यमातून लवकरच पाण्याचा प्रश्न मिटेल.
शहरातील जनतेचा कल भाजपच्या पाठीशी राहिला आहे. यावेळीही आम्हाला यश मिळेल. त्यासाठी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाईल. असेही ते म्हणाले. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत होता.