Mira Bhayandar: अग्निशमन दल फटाके स्टॉलवर तैनात, नागरिकांचा संताप,'आगीच्या घटना वाढल्या तर, जबाबदार कोण?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:11 IST2025-10-20T18:08:29+5:302025-10-20T18:11:27+5:30
लाखो रुपयांचा धंदा करणाऱ्या फटाके विक्रेत्यांना मीरा भाईंदर महापालिकेने चक्क फुकट अग्निशमन दल सेवा पुरवली आहे.

Mira Bhayandar: अग्निशमन दल फटाके स्टॉलवर तैनात, नागरिकांचा संताप,'आगीच्या घटना वाढल्या तर, जबाबदार कोण?'
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड- लाखो रुपयांचा धंदा करणाऱ्या फटाके विक्रेत्यांना मीरा भाईंदर महापालिकेने चक्क फुकट अग्निशमन दल सेवा पुरवली आहे. फटाके विक्रेत्याची सुरक्षेची जबाबदारी असताना महापालिकेने मात्र शहरातील ठिकठिकाणी फटाके विक्रेत्यांच्या स्टॉल येथे अग्निशमन दलाचे प्रत्येकी तीन जवान आणि एक अग्नीशामक बंबची फुकट सुविधा देत शहरातील नागरिक मात्र वाऱ्यावर असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
मीरा भाईंदर महापालिका आणि पोलीस परिमंडळ १ अंतर्गत अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, शासनाच्या गृह आणि नगरविकास विभागचे आदेश तसेच विस्फोटक अधिनियम आणि नियमचे सर्रास उल्लंघन करून बोगस मैदान दाखवून रस्त्या लगत वर्दळ व गर्दीच्या ठिकाणी भर निवासी वस्ती जागोजागी नियमबाह्य फटाका स्टॉल परवानग्या दिल्याचे आरोप आहेत. पालिका आणि पोलिसांच्या बैठकीत बहुतांश नियमबाह्य अशी एकूण २७ जागा निश्चित केल्या.
परवानगी आधीच बेकायदा फटाके स्टॉल लागून विक्री सुरु झाली असताना त्यावर कारवाईस टाळाटाळ केली. उलट अनधिकृत स्टॉल ना परवानगी द्यावी म्हणून चक्क विविध पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनीच रस्त्या लगत आणखी स्टॉलना परवानगी देण्याची शिफारस केल्याने स्वतः पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी आणखी २७ जागाना मंजुरी देण्याचे पत्र पालिका आयुक्तांना दिले. त्यामुळे यंदा फटाके विक्री स्टॉलने उच्चांक गाठला आहे.
त्यातच पालिकेने कहर करत लाखो रुपयांचा धंदा करणाऱ्या फटाके विक्रेत्यांच्या दिमतीला चक्क फुकटची अग्निशमन दल सुरक्षा पुरवली आहे. वास्तविक अग्निशामक सुरक्षेची जबाबदारी फटाके विक्रेत्यांची असून अटीशर्ती मध्ये तसे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे विक्रेत्याने काय उपाययोजना केल्या आहेत? अटीशर्तींचे उल्लंघन केले नाही ना? ह्याची काटेकोर तपासणी पालिका व पोलिसांनी करण्या ऐवजी पालिकेने अग्नीशमन दलच फटाके विक्रेत्यांच्या दारी नेऊन ठेवले आहे.
शहरातील अनेक रस्ते लगत गर्दीच्या जागी असलेल्या फटाके स्टॉलच्या ठिकाणी प्रत्येकी ३ अग्निशमन दलाचे जवान आणि एक अग्निशमन बंब सकाळ पासून रात्री पर्यंत तैनात ठेवले आहे. दिवसरात्र तैनात ह्या जवानांना बसण्यास जागा, स्वच्छता गृह आदी काहीच सुविधा नसून उन्हात धूळखात त्यांना फटाके विक्रेत्यांच्या सेवे साठी अधिकाऱ्यांनी जुंपले आहे. दिवाळीच्या दरम्यान आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात लागत असतात. मात्र वाहने आणि जवान फटाके विक्रेत्यांच्या दावणीला फुक बांधल्याने अग्निशमन केंद्रात त्यामुळे वाहने आणि जवानांची संख्या कमी झाली आहे.
"अग्निशमन केंद्रात पण पुरेसे कर्मचारी आणि वाहने असून फटाके विक्रेत्यांच्या ठिकाणी एक अग्निशामक वाहन व ३ कर्मचारी असे ७ - ८ ठिकाणी तैनात केले आहेत. कुठे दुर्घटना घडल्यास त्यांच्याशी समन्वय साधून ते देखील मदतकार्यासाठी घटनास्थळी जातील", महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले.
"परवाने ह्यांनी द्यायचे आणि तिकडे उन्हातान्हात अग्निशमन दलाचे सामान्य जवान यांना दिवसरात्र रस्त्यावर बसवायचे. अग्निशमन गाडी द्यायची हे गंभीर असून तात्काळ हे बंद केले नाही तर सामान्य नागरिकांच्या हितासाठी तक्रारी सह आंदोलन करू. एसी दालनात खाऊन पिऊन निवांत असणाऱ्या ह्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, असे ठाणे लोकसभा शिंदेयुवासेना अध्यक्ष पवन घरत म्हणाले.
भाजपा माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास म्हणाले की, "अग्निशमन दलाचे जवान आणि वाहन पालिकेने तैनात केले म्हणजे फटाके विक्रेत्यानी आवश्यक अग्निशमन यंत्रणा उभारली नाही का? उलट रस्त्यावर वाहन मुळे वाहतूक कोंडी आणि अग्निशमन जवानांची गैरसोय होते. तात्काळ मदतकार्य पोहचवण्याची खरंच कळकळ आहे तर पालिकेच्या कार्यालये, सभागृह आदी मध्यवर्ती जागी वाहन व जवान तैनात करावेत."