“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:56 IST2025-12-01T16:52:37+5:302025-12-01T16:56:05+5:30
Minister Pratap Sarnaik News: कारशेडसाठी नवी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने हाती घेतली जाणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
Minister Pratap Sarnaik News: मीरा-भाईंदर येथील डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प अखेर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. स्थानिक नागरिकांचा सातत्यपूर्ण विरोध, पर्यावरणीय परिणाम आणि भू-उपयोगाशी संबंधित तांत्रिक अडचणी लक्षात घेत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मुख्यालय या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. मीरा-भाईंदर येथील डोंगरी कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर जागेची आवश्यकता असल्याने झाडतोड, वाहतूक कोंडी तसेच परिसराच्या विकास आराखड्यावर परिणाम होणार असल्याबाबत स्थानिक ग्रामस्थ , शहरातील नागरिक, विविध संस्था व पर्यावरणवादी संस्थांनी अनेक आक्षेप नोंदवले होते. या सर्व बाबींचा व्यापक आढावा घेतल्यानंतर पर्यायी जागांचा विचार करणे अधिक योग्य ठरेल, असा निष्कर्ष शासनाने काढला आहे.
अधिसूचना जारी झाल्यानंतर कारशेडसाठी नवी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने हाती घेतली जाणार असून मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. सरकारच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे डोंगरीतील रहिवाशांनी व पर्यावरणवादी कार्यकर्ते, संघटनांनी समाधान व्यक्त केले असून पर्यावरण आणि नागरिकहिताला प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.