Solapur Earthquake: जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती जाहीर केली. आज सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून ५ किमी खाली होते. सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचं पुढे आले आहे.
याआधी मंगळवारी भारतातील पूर्व भागातील कोलकाता, इंफाल येथे भूकंपाचे धक्के जाणवले. २८ मार्च रोजी नेपाळला आलेल्या भूकंपाचे धक्के बिहारच्या सिलीगुडी आणि आसपासच्या परिसरात बसले. २ एप्रिल रोजी सिक्किमच्या नामची येथे तर १ एप्रिलला लेह लडाखमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. ३१ मार्च रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग, शी योमी, सिक्किममधील गंगटोकमध्येही जमिनीला हादरे बसले. २९ मार्च रोजी हरियाणाच्या सोनीपत येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. इथं दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी २.३ रिश्टर स्केल भूकंपाने जमीन हादरली होती.
देशात कुठे कुठे भूकंपाचे केंद्र?
भूवैज्ञानिकानुसार, भारतातील ५९ टक्के जमीन भूकंप क्षेत्राखाली संवेदनशील मानली जाते. भारतात भूकंप क्षेत्राला ४ भागात विभागले गेले आहे. त्यात झोन २, झोन ३, झोन ४ आणि झोन ५ नाव दिले आहे. झोन ५ सर्वाधिक संवेदनशील भाग आहे. राजधानी दिल्ली झोन ४ मध्ये येते जे चिंताजनक झोन आहे. म्हणजे इथं ७ रिश्टर स्केलहून अधिक भूंकपाचे धक्के जाणवू शकतात. जर ७ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असेल तर नुकसान अधिक प्रमाणात होऊ शकते.
म्यानमारप्रमाणे भारतात विध्वंसक भूकंप येणार?
अलीकडेच म्यानमारमध्ये ७.७ आणि ६.४ रिश्टर स्केलचे दोन भयानक भूकंप झाले. या भूकंपामुळे म्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस झाला, ज्यात आतापर्यंत २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. ३०० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. म्यानमारमधील या भूकंपाचा धक्का शेजारील देश थायलंडलाही बसला आहे. भारताच्या पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये गंगा-बंगाल फॉल्ट आहे, तर म्यानमारमध्ये सागिंग फॉल्ट आहे. या दोन फॉल्टमध्ये इतर अनेक फॉल्ट लाइन्स आहेत. अशा परिस्थितीत, एक फॉल्ट सक्रिय झाल्यामुळे दुसरा फॉल्टदेखील सक्रिय होऊ शकतो आणि यामुळेच भारतातदेखील भयंकर भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा IIT कानपूरच्या शास्त्रज्ञाने दिला आहे.