Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 18:58 IST2025-11-09T18:55:13+5:302025-11-09T18:58:17+5:30
Mhada News: काही दिवसापूर्वी काही माध्यमांनी पुण्यातील म्हाडाच्या एका प्रोजेक्टबद्दल बातम्या दिल्या. त्यात म्हटलं गेलं की, आता ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये मिळणार आहे आणि म्हाडानेच याची घोषणा केली आहे. हे खरं आहे की खोटं याबद्दलच म्हाडाने माहिती दिली.

Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
Mhada Pune: पुण्यातील वाकड आणि हिंजेवाडी भागात म्हाडाने कमी किंमतीत घरे उपलब्ध करून दिली असून, ९० लाखांची घरे २८ लाखांमध्ये मिळणार आहे, असे वृत्त काही माध्यमांनी दिले. पण, हे वृत्त खोटे आहे. म्हाडाने याबद्दल खुलासा केला असून, नागरिकांनी अफवांपासून दूर राहावे असे आवाहन केले आहे.
महानगरांमध्ये घरांच्या किंमती प्रचंड वाढल्या असून, म्हाडाकडून परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जात आहे. पण, पुण्यातील वाकड आणि हिंजेवाडीमध्ये म्हाडा ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये देणार असल्याचे काही माध्यमांनी वृत्त दिले. हे वृत्त म्हाडाने फेटाळून लावले आहे.
म्हाडाच्या लॉटरीबद्दल फेक न्यूज
म्हाडाच्या वतीने फेक न्यूजबद्दल माहिती देताना सांगण्यात आले की, "सध्या सोशल मीडियावर म्हाडाच्या नावाने पुणे शहराबाबतीत काही खोट्या सोडती व बातम्या प्रसारित होत आहेत. कृपया अशा अफवांना बळी पडू नका. म्हाडातर्फे अशी कोणतीही सोडत जाहीर करण्यात आलेली नाही."
९० लाखांचे घर २८ लाखांमध्ये देणार असल्याच्या वृत्ताबद्दल म्हाडाने म्हटले आहे की, "अशा प्रकारची कोणतीही सोडत म्हाडातर्फे जाहीर करण्यात आलेली नाही. कृपया अशा जाहिरातींना, बातम्यांना बळी पडू नका. अचूक माहितीसाठी कृपया म्हाडाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजला फॉलो करा आणि www.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करा."
🚨 महत्त्वाची सूचना!
— MHADA (@mhadaofficial) November 7, 2025
सध्या सोशल मीडियावर म्हाडाच्या नावाने पुणे शहराबाबतीत काही खोट्या सोडती व बातम्या प्रसारित होत आहेत. कृपया अशा अफवांना बळी पडू नका. म्हाडातर्फे अशी कोणतीही सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. pic.twitter.com/EYU4uTn6hB
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले होते की, घरांची किंमत २८.४२ लाख ते २८.७४ लाखांपर्यंत असणार आहे. याच भागात घरांची किंमत ८० ते ९० लाख आहे. वाकड आणि हिंजेवडी या भागात ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हाडाने यशविन आर्बो सेंट्रो या खासगी गृहनिर्माण प्रकल्पात २ बीएचके आणि ३ बीएचके फ्लॅट्स देखील देऊ केले आहेत, असेही वृत्त काही माध्यमांनी दिले होते. पण, खोटं असल्याचे आता म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.