देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:30 IST2025-11-17T11:28:53+5:302025-11-17T11:30:41+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात ही घटना घडली आहे. पंतप्रधान कार्यालयात सचिव असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली. एका लग्नालाही ते उपस्थित होते. याचवेळी त्यांना एक व्यक्ती भेटला. मी पंतप्रधान कार्यालयात सचिव असल्याचे त्याने मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितले आणि त्याचा सत्कारही करण्यात आला. पण, पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याची चौकशी केली आणि बिंग फुटले. त्याच्यासोबत असलेल्या त्याचा सुरक्षारक्षकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी एका लग्न समारंभाला उपस्थित होते. यावेळी एक व्यक्ती सोहळ्यात फिरत होता. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटला. मी पंतप्रधान कार्यालयात सचिव आहे, असे तो सगळ्यांना सांगत होता. त्याचा लग्नात सत्कारही करण्यात आला.
पीएमओ कार्यालयात सचिव असल्याचे सांगणाऱ्या या व्यक्तीबद्दल पोलिसांना शंका आली. त्याच्यासोबत एक सुरक्षारक्षकही होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्या बॅगेमध्ये मराठी आणि इंग्रजी पाटी, राष्ट्रध्वज मिळाला.
चौकशीमध्ये मध्ये तो तोतया अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. अशोक भारत ठोंबरे (रा. दिल्ली, मूळ गाव उंदरी, ता. केज, जिल्हा बीड) असे पंतप्रधान कार्यालयात सचिव असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यासोबत विकास प्रकाश पांडागळे (रा. पुणे) हा सुरक्षारक्षक म्हणून फिरत होता.
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांनी सचिव असल्याचे सांगून कुणाला गंडा घातला आहे का? कुणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.