विलिनीकरणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) वरिष्ठ नेते विरोधी भूमिकेत असताना पक्षातील आमदार हिरामण खोसकर यांनी दोन्ही पक्षांचे शंभर टक्के विलिनीकरण झाले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यावर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर भूमिका मांडली आहे.
दिल्लीत सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांना आमदार खोसकर यांच्यामुळे पुन्हा विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नेतृत्व कुणाकडे असेल? असा प्रश्न विचारला गेला.
सुनील तटकरे म्हणाले, "विलिनीकरणाची चर्चा कुठे सुरू झाली आहे. हिरामण खोसकर यांनी आमदार म्हणून भावना व्यक्त केल्या आहेत. ती काही पक्षाची भूमिका नाही. मी वारंवार स्पष्ट केले आहे की, तिकडून (राष्ट्रवादी शरद पवार) ज्यावेळी सुरू होईल. त्यावेळी त्यावर चर्चा होईल."
एकत्र बसू आणि चर्चा करू
"मी हेही म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन विचार केव्हा आले, तर जेव्हा आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा २०२३ मध्ये आले. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दोन वेगवेगळी पक्ष आहेत. ज्या काही पक्षातील भावना असतील, आम्ही एकत्र बसू आणि त्यावर चर्चा करू", अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली.
हिरामण खोसकर नक्की काय म्हणाले?
"दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण शंभर टक्के झाले पाहिजे. जर दोन्ही पक्षांना वाटत असेल की, आपला नेता गेला. नेत्याला खरी श्रद्धांजली वाहायची असेल, तर त्यांचं जे दोन-तीन महिन्यापासून सुरू होतं की, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे, तसे झाले तर आम्हाला आनंद होईल", असे म्हणत आमदार खोसकर यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती यालाही दुजोरा दिला.
"सुनेत्रा पवार या गॉडफादर आहेत. पण, त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कम पाठिंबा द्यायला हवा. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. जयंत पाटील हे अनुभवी नेते आहेत. बाळासाहेब पाटील आहेत. राजेश टोपे हे आहेत. विलिनीकरण झाले, तर आम्हाला मोठा दिलासा मिळेल. ही चांगली गोष्ट होईल", असेही आमदार खोसकर म्हणाले आहेत.
'शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा'
"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. १२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार, हे आम्ही ऐकले होते. दादांनी आम्हाला तशी कल्पना दिली नव्हती. पण, विलिनीकरण होणार हे शंभर टक्के माहिती होती. आमच्या कानावर विलिनीकरणाची चर्चा येत होती. विलिनीकरण जर झाले, तर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार या असाव्यात. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा. शशिकांत शिंदे जे विलिनीकरणाबाबत जे म्हणत आहेत, ते शंभर टक्के झाले पाहिजे", अशी भूमिका आमदार हिरामण खोसकर यांनी मांडली आहे.