सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती महागात पडली; नवाब मालिकांनी साधला भाजपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 15:06 IST2019-11-18T15:05:40+5:302019-11-18T15:06:15+5:30
भाजपमध्ये असलेले आमदार त्यांच्या मूळ पक्षाचे नसून, सत्तेसाठी ते त्या पक्षात गेलेले आहेत.

सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती महागात पडली; नवाब मालिकांनी साधला भाजपवर निशाणा
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 24 दिवस उलटले असताना सुद्धा सत्तास्थापनेचा तिढा काही सुटायला तयार नाहीत. तर विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपकडून करण्यात आलेल्या मेगाभरतीवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.सत्तेच्या लोभात केलेली ही मेगाभरती महागात पडली असल्याचा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मलीक म्हणाले की, आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट ठरली आहे. त्यांनतर पुढील दिशा निश्चित होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेत्यांमध्ये उद्या ( मंगळवारी ) बैठक होणार आहे. तसेच सोनिया गांधी आणि पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एकदा ठरले की, सत्ता स्थापन होईल.
तर भाजपमध्ये असलेले आमदार त्यांच्या मूळ पक्षाचे नसून, सत्तेसाठी ते त्या पक्षात गेलेले आहेत.त्यामुळे ज्यांच्याकडे सत्ता येईल तिकडे हे आमदार जाऊ शकतात. तसेच त्यांना पक्षात टिकून ठेवण्यासाठी पुन्हा भाजपचे सरकार येणार असल्याचे त्यांचे नेते म्हणत आहे. फक्त सत्तेच्या लोभासाठी भाजपने ही मेगाभरती केली होती.
मात्र आता सत्तासमीकरणे बदलले तर मेगाभरती करून पक्षात घेतलेले आमदार पुन्हा उलट्या दिशेने जातात की काय अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती भाजपला महागात पडली असल्याचे सुद्धा मलीक म्हणाले. तसेच या भीतीने ते आमचं सरकार येणार असून शिवसेनेचे आमदार फुटणार असल्याचे बोलत असतात, असेही मलीक म्हणाले.