राज्यात मेगा पोलीस भरती; साडेबारा हजार पदे भरणार- मंत्रिमंडळाची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:11 IST2020-09-17T05:26:17+5:302020-09-17T06:11:35+5:30
राज्यात सध्या पोलीस शिपायांची संख्या ९७ हजार इतकी आहे. शिपायांमधून पदोन्नती मिळालेले पोलीस नाईक ४२ हजार, हेड कॉन्स्टेबल ४३ हजार आणि एएसआय २० हजार अशी संख्या आहे.

राज्यात मेगा पोलीस भरती; साडेबारा हजार पदे भरणार- मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई : राज्यात पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एवढी मेगाभरती राज्यात पहिल्यांदाच होत आहे.
राज्यात सध्या पोलीस शिपायांची संख्या ९७ हजार इतकी आहे. शिपायांमधून पदोन्नती मिळालेले पोलीस नाईक ४२ हजार, हेड कॉन्स्टेबल ४३ हजार आणि एएसआय २० हजार अशी संख्या आहे. नव्या भरतीमुळे सध्याच्या यंत्रणेवरील भार हलका होईल. २०१९ आणि २०२० या वर्षांत साडेबारा हजार पदे भरण्याचे नियोजन गृह विभागाने केलेले आहे. २०१९ मध्ये ५२९७ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती. मात्र, राज्य शासनाच्या ४ मे २०२० च्या आदेशानुसार सर्वच प्रकारच्या शासकीय नोकर भरतीस मनाई करण्यात आली होती.
मराठा समाज आरक्षणाबाबत निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीत या समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता दिसत नाही. या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने गृह विभागाला दिले आहेत.
लॉकडाऊनमुळे शासनाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने हा निर्णय घेतला होता. दुसऱ्या टप्प्यात चालू वर्षी ६७२६ पदे भरावयाची आहेत. या दोन्ही टप्प्यांमधील भरतीस शासन निर्णयातून सूट देत साडेबारा हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया जलद आणि पारदर्शकरित्या पूर्ण केली जाईल. या भरतीमुळे पोलीस दलावरील कामाचा ताण नक्कीच कमी होईल.
- अनिल देशमुख, गृहमंत्री