वैद्यकीय प्रवेशाच्या फेऱ्यांना मुदतवाढीचा फेर, विद्यार्थ्यांमध्ये चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:15 IST2025-10-18T13:15:04+5:302025-10-18T13:15:37+5:30
दोनच राऊंड पूर्ण

वैद्यकीय प्रवेशाच्या फेऱ्यांना मुदतवाढीचा फेर, विद्यार्थ्यांमध्ये चिंता
सांगली : मेडिकल कौन्सिलिंग कमिटीकडून सातत्याने मुदतवाढीचा फेर धरला गेल्याने राज्यातील वैद्यकीय पदवी प्रवेश फेऱ्यांना विलंब झाला आहे. निकालानंतर तब्बल चार महिन्यात वैद्यकीय प्रवेशाच्या केवळ दोनच फेऱ्या पूर्ण झाल्याने चालू वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या पूर्णत्वाची व विलंबाची चिंता विद्यार्थ्यांच्या मनात दाटली आहे.
वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही मेडिकल कौन्सिलिंग कमिटी म्हणजेच एमसीसीमार्फत पार पाडली जाते. मात्र, यंदा पहिल्याच फेरीत पसंतीक्रम भरण्यासाठी (चॉईस फिलिंग) तब्बल सातवेळा तर दुसऱ्या फेरीच्या चॉईस फिलिंगला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर विविध राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता तर काही महाविद्यालयांच्या जागा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे तिसऱ्या फेरीत प्राधान्यक्रम देण्यासाठी पुन्हा दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. बुधवारी त्याची मुदत संपल्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशनमार्फत पुन्हा काही वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्याने आता पुन्हा मुदतवाढीचा खेळ रंगण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही राज्याच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे केंद्रीय प्रवेशाची तिसरी फेरी पार पडल्याशिवाय महाराष्ट्र व इतर राज्यांच्या तिसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर करता येत नाही. त्यामुळे राज्याची तिसरी प्रवेश फेरीही लांबणीवर गेली आहे.
महाराष्ट्रात काही एमबीबीएस व दंत महाविद्यालयांनी दुसऱ्या फेरीनंतर अभ्यासक्रमांना सुरुवात केली आहे. उशिरा प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास यामुळे बुडणार आहे. त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करताना कसरत करावी लागेल.
आयुषच्या अभ्यासक्रमांना विलंब
एमबीबीएस व दंतवैद्यकीयच्या प्रत्येक फेरीनंतर आयुष अभ्यासक्रमासाठी प्रवेश फेरी होत असल्याने या अभ्यासक्रग्मांचे प्रवेश आणखी लांबणीवर पडणार आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता ही जूनअखेरीस निश्चित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रकही ‘नीट’च्या निकालानंतर तात्काळ प्रसिद्ध व्हायला हवे. या सर्व प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी आणि पालकांच्या संयमाची परीक्षा पाहिली जातेय. विनाकारण त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे दरवर्षीचा हा गोंधळ थांबणे आवश्यक आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक