supriya sule on marathi schools and teachers : मराठी शाळा बंद आहेत आणि पाच हजारांहून अधिक शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. याकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "१० ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शासन निर्णय काढून ५००० विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, आज जुलै २०२५ पर्यंत देखील या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. ही शिक्षकांची मोठी फसवणूक आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व मराठी शाळा बंद असतील आणि पाच हजारांहून अधिक शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करत असतील, तर तुम्ही यात गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे."
"ही लोकशाही आहे आणि आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढण्याचा अधिकार भारतातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिला आहे. जर एखाद्या नागरिकाने आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढला, तर त्यात गैर काय? आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार नाही का या राज्यात? जर सरकार लोकांचा आवाज दडपण्याचं काम करत असेल, तर ती लोकशाही नव्हे, दडपशाहीच ठरेल. अशा वेळी गृहखातं काय करत आहे? त्यामुळे मीरा-भाईंदरमधील परिस्थितीला मुख्यमंत्री आणि गृहखातं जबाबदार आहे. डॉ. आंबेडकर यांनी घटनेप्रमाणे एका सशक्त लोकशाहीत प्रत्येक भारतीयाला आंदोलन करायचा अधिकार दिला आहे," असे त्यांनी ठणकावले.
"हे ओरिजनल भाजपाला शोभणारं नाही..."
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा वेगळं आणि दुसऱ्यांदा वेगळंच काहीतरी बोलतात. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मी समजत होते की, भाजपा हा एक सुसंस्कृत राजकीय पक्ष आहे. मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचं वागणं मग ते भाषा, प्रांत, वागणूक आणि ज्या धमक्या दिल्या जात आहे, हे ओरिजनल भारतीय जनता पक्षाला शोभणारं नाही. हे न शोभणारं कल्चर भाजपामध्ये कुठून येत आहे? कारण ही लोकशाहीला शोभणारी बाब नाही. अर्थातच या सगळ्या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.