'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:16 IST2025-09-02T17:14:24+5:302025-09-02T17:16:38+5:30
'मराठा आणि कुणबी एक आहेत' या संदर्भातील जीआर काढण्यासंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाचे काय म्हणणे आहे? यासंदर्भात खुद्द जरांगे पाटील यांनीच, मराठा बांधवांना माहीत दिली आहे...

'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनासाठी राज्यातील शेकडो मराठा बांधव मुंबईत आले आहेत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस आहे. आज त्यांच्या मागण्यांसंदर्भात अंतिम मसुदा घेऊन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. दरम्यान, 'मराठा आणि कुणबी एक आहेत' या संदर्भातील जीआर काढण्यासंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाचे काय म्हणणे आहे? यासंदर्भात खुद्द जरांगे पाटील यांनीच, मराठा बांधवांना माहीत दिली आहे.
जरांगे म्हणाले, "आपण त्यांना (सरकारला) म्हणालो होतो, मराठा आणि कुणबी एक आहेत हा 58 लाख नोंदणीचा जीआर काढा. त्यांचे म्हणणे आहे की, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभराचा वेळ द्या. तुमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार, मराठा आणि कुणबी एक आहे, हा जीआर काढण्यासाठी, मी म्हणालो, एक नाही दीड महिना घ्या, पण जीआर काढा. पुढे जरांगे म्हणाले, विखे साहेब बरोबर ना? विखे साहेबांचा हात जरा जड दिसतोय ते म्हणाले दोन महिने म्हणा दोन महिने. बरं दोन महिने. चला त्यांच्या म्हणण्या प्रमाणे. कारण शिंदे समितीने आपल्याला विखे साहेबांचे नाव सांगितले आहे."
"रीहिला विषय 'सगेसोयरे'चा, त्यावर आलेल्या हरकतींच्या छाननीसाठी थोडा वेळ लागणार आहे. आठ लाख आणखी हरकती आल्या आहेत, असे त्यांचे (शिष्टमंडळाचे) म्हणणे आहे, असेही जरांगे म्हणाले.
"खाताना मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे चालायचे" -
जरांगे पुढे म्हणाले, "पोरांनो तुम्हाला इमानदारीने सांगतो. जोवर मी आहे, तोवर तुम्हाला डंख नाही. तुम्ही पोरं समजून घ्या, खाताना मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे चालायचे. तुम्ही थोडा घास खाल्ला, तर पोट भरचालेल आणि तुम्ही एकदमच जर ओंजलभर खाल्ला तर नरड्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या प्रकारचं स्वराज्य दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढच्याला कळू तर दिले नाही, पण कापून तर माघारी आले, बिना कापल्याचं माघारी आले नाही."
"थोडंसं डोक्या डोक्याने चालू, या न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्यात. दोन गॅझिटियरची ते आंमल बजावणी करून, ते इतर सहा मागण्याची अंमल बजावणी करत आहेत. सर्वांचा जीआर काढून." असे जरांगे यांनी सांगिलते. यावेळी त्यांनी विखेंना विचाले, विखे साहेब, सर्वांचा जीआर काढत आहात ना? यावर विखे यांनी होकार दर्शवला.
काय म्हणाले विखे पाटील -
यावर राधाकृष्ण विखे म्हणाले, "मी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एवढे सांगतो की, हे तर आम्ही करतच आहोत. पण जे लोकांची मागणी कधीही पूर्ण झाली नसती, गेले 50 वर्ष मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर, मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागे लागून, त्यांनीही याला होकार दिला. आपण त्या मदतमाश-खिदमतमाशच्या जवळ-जवळ दीड लाख हेक्टर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत करून दिल्या आहेत गेल्या काही महिन्यात. धारशिव शहर संपूर्ण क्लास टूवर होतं. ते आता क्लास वनवर आलं. यामुळे धाराशिव, नांदेड, बीड, जिल्ह्यातील लोकांना याचा फार उपयोग झाला. म्हणजे आपली भूमिका अगदी सकारात्मक आहे. पण आपण ज्या भूमिका मांडत आहात. याची जाणीव आम्हाला आहे ना. यामुळेच आम्ही चार पाच दिवस कायद्याच्या सर्व बाबी तपासूनच आपल्याकडे आलो आहोत."
यावर, "हे झालंय, आता समाजाचा आपमाण होऊ देऊ नका. तसेच यात कुणी आडवं आलं तरी, हे टिकवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी," असे जरांगे म्हणाले.