Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:08 IST2025-09-02T16:07:36+5:302025-09-02T16:08:58+5:30
Manoj Jarange Patil wife: मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनीही अन्नत्याग केला आहे.

Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे. मुंबईतील आझाद मैदानात हे उपोषण सुरू असून, जरांगे यांच्या कुटुंबीयांनी अन्नत्याग सुरू केला आहे. मनोज जरांगे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलीनेही २९ ऑगस्टपासून अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे.
मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू आहे. त्यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे पाटील, मुलगा शिवराज आणि मुलगी पल्लवी यांनीही अन्नत्याग करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सुमित्रा जरांगे पाटील म्हणाले, "२००३ मध्ये आमचं लग्न झालं. मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण आयुष्य मराठा समाजासाठी झोकून दिलं आहे."
मुलगी पल्लवी म्हणाली, "मुंबईमध्ये आंदोलनादरम्यान काय घडत आहे, ते आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि भीती वाटली. बाबांनी आम्हाला आंदोलनाच्या ठिकाणी येऊ नका असं सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही फोनही केला नाहीये."
मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील मातोरी तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी २९ ऑगस्ट रोजीच आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे यावेळीही उपोषणासाठी २९ ऑगस्ट हीच तारीख निवडण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी उपोषण सुरू केलं. त्यांना पहिले चार दिवस उपोषण करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र पाचव्या दिवस परवानगी दिली गेली नाही आणि पोलिसांनी त्यांना रिकामे करण्याची नोटीस बजावली.
अटी शर्थींसह उपोषण करण्याची परवानगी दिली गेली होती, मात्र त्यांचं पालन झाले नाही. बेकायदेशीर कृत्य आंदोलकांकडून झाले. त्याचबरोबर आपणही धमकीची भाषा वापरल्याचे सांगत पोलिसांनी आता परवानगी दिली जाणार नाही, लवकरात लवकर मैदान रिक्त करा, असे बजावले होते. मात्र, जरांगे यांनी आपण आझाद मैदानातून हटणार नाही, अशी भूमिका घेतली.