Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!

By सीमा महांगडे | Updated: September 1, 2025 12:12 IST2025-09-01T12:10:56+5:302025-09-01T12:12:16+5:30

आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले असून, रविवारी पहाटे ३ वाजल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या तुकड्या कार्यरत आहेत.

Maratha Kranti Morcha: 800 municipal employees on cleanliness drive from 3 am | Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!

Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!

सीमा माहांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले असून, रविवारी पहाटे ३ वाजल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या तुकड्या कार्यरत आहेत. आंदोलकांना पालिकेकडून कचरा संकलनासाठी पिशव्या (डस्टबिन बॅग) मोठ्या संख्येने वितरित करण्यात येत असून, त्यातच आंदोलकांनी कचरा टाकून तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवावा, असेही आवाहन महापालिकेच्यावतीने केले जात आहे. 

आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून महापालिकेने एकूण २५ टँकर उपलब्ध करून दिले आहेत. आझाद मैदान, महापालिका मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, हुतात्मा स्मारक चौक, बॉम्बे जिमखाना, हज हाऊस, मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे, एअर इंडिया इमारत, त्याचप्रमाणे यलो गेट, फ्री वे वर शिवडी, कॉटन ग्रीन वाहनतळ, वाशी जकात नाका याठिकाणी या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

हजारो जणांनी घेतला वैद्यकीय सुविधांचा लाभ
आझाद मैदान परिसरात २४ तास कार्यरत वैद्यकीय मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्याद्वारे गरजूंना आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. महापालिकेच्या नायर रुग्णालयाकडून देखील याठिकाणी वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाच्यावतीने जे. जे. रुग्णालयाचे पथक देखील आझाद मैदान परिसरात नेमण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार ३७ आंदोलनकर्त्यांनी वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतला आहे. तसेच १०८ रुग्णवाहिका सेवेच्या चार रुग्णवाहिका आंदोलनस्थळी उपलब्ध आहेत.

Web Title: Maratha Kranti Morcha: 800 municipal employees on cleanliness drive from 3 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.