Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 08:08 IST2025-09-02T08:07:28+5:302025-09-02T08:08:20+5:30
Maratha Kranti Morcha: चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या आंदोलकांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे.

Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या आंदोलकांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे. आंदोलकांनी आणलेल्या चारशे गाड्या आझाद मैदानाजवळील रस्त्यांवर दुतर्फा उभ्या आहेत, तर आंदोलकांच्या मुंबईत दहा हजार गाड्या आल्याचा अंदाज आहे. त्यापैकी ५ हजार गाड्या परत गेल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सोमवारी आंदोलकांची अनेक वाहने मुंबईच्या वेशीवर अडवण्यात आली.
मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर असलेली आंदोलकांची वाहने हटवण्यासाठी पोलिस मराठा समन्वयकांची मदत घेत होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही हजारो आंदोलक मुंबईकडे येत होते. मात्र, आंदोलकांच्या गाड्या पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच थांबविल्या. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसले. गेल्या चार दिवसांत १० हजारांहून अधिक वाहने मुंबईत धडकली.
मुंबईत सोमवारी कसे होते चित्र?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी, ‘एक तर गुलाल उधळेन, नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल‘ असे म्हटल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले होते. चौथ्या दिवशी आंदोलकांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी) स्थानकासमोरील डी. एन. रोडवर ५० आंदोलक रस्त्यावर उतरले होते.
अधिकाऱ्यांसह २००० पोलीस तैनात
बंदोबस्तासाठी सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्यासह ५ अपर पोलिस आयुक्त, ९ पोलिस उपायुक्त आणि २००० पोलिस अधिकारी, अंमलदार, तसेच एसआरपीएफ, सेंट्रल आर्म पोलिस फोर्सच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे; पण बळाचा वापर न करता आंदोलकांना समजावून गर्दी नियंत्रित केली जात आहे. आझाद मैदान, सीएसएमटी परिसरातच ३०० ते चारशे वाहने पार्क करण्यात आली आहेत. त्यात खाण्या-पिण्याची शिदोरी घेऊन येणाऱ्या वाहनांची भर पडताना दिसत आहे. पोलिसांकडून ही वाहने हटविण्याबाबत समन्वयकांच्या मदतीने विनंती करण्यात येत आहे.