मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:27 IST2025-08-19T19:21:38+5:302025-08-19T19:27:59+5:30

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत २० ऑगस्टला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल.

Mansoon Update of Maharashtra: Rains will subside in the state including Mumbai from August 20; Meteorological Department forecasts, red alert for 12 hours for Mumbai, Thane Rain | मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट

मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट

मुंबई - मुंबई शहरात उद्या म्हणजे २० ऑगस्ट दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे. त्याशिवाय पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य भारतावरील एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत २० ऑगस्टला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल. परंतु काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. १९ ऑगस्टच्या तुलनेत २० ऑगस्टला मुंबई शहरासह मुंबई महानगरातील इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र २० तारखेच्या दुपारपर्यंत काही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे आणि त्यानंतर पाऊस अजून ओसरेल. २० तारखेला सर्वात अधिक पाऊस पालघर जिल्हा (प्रामुख्याने उत्तर भाग) आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात पडण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र २० ऑगस्टपासूनच पावसाचा जोर ओसरेल. 

मात्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने पुढील १२ तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, चंद्रपूर हे जिल्हे आणि पुणे घाट, नाशिक घाट या परिसरासाठी रेड अलर्ट दिला आहे. पुढील २४ तासांसाठी रायगड, पुणे घाट जिल्ह्यात रेड अलर्ट तर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, नागपूर, गोंदिया येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २० ऑगस्टला सकाळी ११.३० पर्यंत ३.३ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय समुद्र खवळलेल्या स्थितीत असून ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

पालघर येथील मोरी गावात एनडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी पाठवली आहे. येथील १२० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सावंतपाडा येथे ४४ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर वशिष्ठी, शास्त्री, काजळी, कोदवली आणि बावनदी यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील अंबा नदी, सावित्री आणि कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

मुंबई लोकलची स्थिती

मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद आहे. ठाण्यापासून पुढे लोकल सेवा सुरू आहे. हार्बर रेल्वे सीएसएमटी ते मानखुर्द बंद ठेवण्यात आली आहे. वाशी पनवेल रेल्वे सेवा सुरू आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. मुंबईतील मिठी नदीची पातळी सद्यस्थितीत ३.४ मीटर आहे. मिठी नदीकिनारी राहणाऱ्या ३५० नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.  

Web Title: Mansoon Update of Maharashtra: Rains will subside in the state including Mumbai from August 20; Meteorological Department forecasts, red alert for 12 hours for Mumbai, Thane Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.