रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:48 IST2025-09-02T16:45:08+5:302025-09-02T16:48:10+5:30
Manoj Jarange Patil's Maratha Reservation protest news: सरकारने मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी काही मागण्या मान्य केल्या आहेत. काही मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने एक ते दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. यावर जरांगे यांनी समाधान व्यक्त केले.

रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
मराठा आंदोलकांच्या आठ मागण्यांवर जीआरचा मसुदा घेऊन राधाकृष्ण विखेपाटील, शिवेंद्रराजे भोसले व इतर मंत्री आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहेत. यावेळी जीआरचा मसुदा जरांगे यांनी वाचून दाखविला. तसेच पाटलांनी हो म्हटले तर लगेच जीआर काढतो, असे विखे पाटील म्हणाले. यावर जरांगे यांनी आधी जीआर काढा, आणून द्या मग आम्ही आंदोलन संपवितो, असे सांगितले.
सरकारने मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी काही मागण्या मान्य केल्या आहेत. काही मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने एक ते दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. यावर जरांगे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सरकारकडे काही बदल सुचवत काही मागण्याही केल्या आहेत. मुंबईत आल्यावर आमच्या गावखेड्यातील माणसांनी गल्लांमध्ये गाड्या घातल्या. तुमच्या आरटीओने त्यांच्यावर ५-५ हजारांचा दंड मारला आहे, तो रद्द करावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. आता हे दंड भरायला आम्ही वावर विकायचे का असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच विखे पाटलांनी तुम्ही आंदोलन संपवून निघाला की जीआर काढतो असे म्हटले त्यावर जरांगे यांनी मग मी जातच नसतो, असे सांगत विखे पाटलांना तासाभरात जीआर द्या, असे सांगितले. ते विखेंनी मान्य केले. याचबरोबर कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी पैसे मागितले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. पैसे दिले तरच प्रमाणपत्र असे सुरु असल्याची तक्रार जरांगे यांनी उदाहरणासह करून दिली. तसेच तुम्ही जोवर जीआर आणून देत नाही तोवर मुंबई सोडणार नाही. तुम्ही जीआर आणला की तुमच्या हाताने उपोषण सोडतो. रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो. मराठ्यांची पोरं नाचत जातील, असा शब्द जरांगे यांनी दिला आहे.
मराठा आंदोलक शांततेत आलेत, शांततेत निघून जातील. पोलिसांनी त्यांना त्रास देऊ नये. आंदोलकांनीही काही करू नये, असे जरांगे म्हणाले.