धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:09 IST2025-08-08T14:06:43+5:302025-08-08T14:09:04+5:30
Manoj Jarange Patil News: मराठ्यांच्या नादीच लागायचे नाही. यापुढे मराठ्यांवर अन्याय केला, तर तुमचे कार्यक्रम झालाच असे समजायचे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सक्रिय होऊन आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, अन्यथा समाजच त्यांना त्यांचे उत्तर देईल. मराठा समाजावर गेली सात पिढ्या अन्याय झाला आहे. गरीब मराठा समाजाची मुले शिकली पाहिजेत, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी, प्रतिष्ठा मिळावी यासाठी आरक्षणाचा लढा सुरू असून, तो अंतिम टप्प्यात पोहचला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही, त्यांना मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, ते स्वप्नातही आणू नका. मंत्रिपदाचे सोपे नाही. अजितदादांचा पूर्ण पक्षच संपेल. इतके क्रूर हत्या घडवून आणणारे, इतके गुंड सांभाळणारे, पुन्हा मंत्री केले, तर पक्ष संपेल ना. ते बंगल्यात राहिले काय आणि नाही काय, मला देणेघेणे नाही. यापुढे सांगतो की, कितीही मंत्री होऊ दे, आमचे ते दुःख नाही. ज्याच्यावर अन्याय झाला, त्याला न्याय देणे काम आहे. तुम्ही दोन काय चार मंत्री व्हा. आम्हाला फरक पडत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. काही करा. अन्याय केला की वाजवणार. सोडणारच नाही. मी आहे तोवर तरी नाही. मराठ्यांच्या नादीच लागायचे नाही. बाकीच्यांवर अन्याय तुम्ही करतच आहात. पण यापुढे मराठ्यांवर अन्याय केला, तर तुमचे कार्यक्रम झालाच असे समजायचे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत
बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत असून, प्रशासनही तितकेच यामध्ये गुंतले आहे. अजितदादांकडे बीडचे पालकमंत्रिपद आहे, तरीही गुन्हेगारी थांबण्याऐवजी सुरूच आहे. यामुळे प्रशासनावर वचक नाही, हे सिद्ध होते, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. बीडचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असले तरी जोपर्यंत परळी तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी बदलले जात नाही तोपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवता येणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईत २९ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन म्हणजे आरपार आणि अटीतटीची अंतिम लढाई असणार आहे. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.