जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:12 IST2025-09-02T17:10:42+5:302025-09-02T17:12:04+5:30
Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: जीआर निघाला तर एका तासात मुंबई रिकामी करण्यास सुरुवात करू, गुलाल उधळत जाऊ असे जरांगे म्हणाले आहेत.

जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
मराठा आंदोलकांच्या अभ्यासकांनी जीआरचा मसुदा योग्य असल्याचे कळविताच आंदोलक मनोज जरांगे यांनी चार मंत्र्यांच्या शिष्टमंडळला होकार कळविला आहे. यानंतर हा जीआर मसुदा घेऊन राज्याचे अधिकारी रवाना झाले आहेत. तासाभरात हा जीआर काढून जरांगेंकडे आणला जाणार आहे. अशातच जरांगे यांनी मंत्र्यांसमोर जर या जीआरमध्ये काही दगाफटका झाला तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
हा जीआरचा मसुदा आता मराठा आंदोलकांच्या वकिलांकडे वाचण्यासाठी देण्यात आला आहे. राज्य सरकार तासाभरात जीआर आणणार आहे. यानंतर उपोषण मागे घेणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. जीआर निघाला तर एका तासात मुंबई रिकामी करण्यास सुरुवात करू, गुलाल उधळत जाऊ असे जरांगे म्हणाले आहेत.
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो. मागण्या मान्य झाल्या की, सगळे मराठे आनंद व्यक्त करत मुंबईच्या बाहेर पडतील. सरकारने एकूण ३ जीआर काढावेत. सातारा, हैदराबाद गॅझेटियरचा वेगवेगळा जीआर आणि आमच्या इतर मागण्यांचा वेगळा जीआर काढावा, अशी अट जरांगे यांनी विखे पाटलांसमोर ठेवली. मराठा आंदोलनासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांंना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. मराठा-कुणबी एकच असल्याचा जीआर काढण्यासाठी २ महिन्याचा वेळ लागणार आहे. यामुळे दोन मागण्यासोडून अन्य मागण्यांचा जीआर काढण्यास सरकारने तयारी दर्शविली आहे.