छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:51 IST2025-05-20T11:51:06+5:302025-05-20T11:51:41+5:30

अजितदादा प्रत्येकवेळी प्रचंड मोठी चूक करतायेत. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम अजितदादा करतायेत. का करतायेत हे कळत नाही असं जरांगे यांनी म्हटलं.

Manoj Jarange Patil got angry as soon as Chhagan Bhujbal returned to the cabinet; gave a telling warning to Ajit Pawar | छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा

छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा

छत्रपती संभाजीनगर - जातीवादी लोकांना पोसण्याचं काम अजितदादा का करत आहेत हे कळत नाही. अजितदादांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. मराठा आरक्षणाचे मारेकरी अजितदादा मंत्रि‍पदी घेत असतील तर यापुढे मराठ्यांनाही एकजूट व्हावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर दिली आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळांना मंत्री बनवणे हा त्यांच्या पक्षातंर्गतला प्रश्न आहे. ते पहिलेही मंत्री होते आणि आताही मंत्री झालेत. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीयवादी तणाव निर्माण करायचा हे अजितदादांना का कळत नाही. अजितदादांचे जे आमदार आहेत, त्यांनाही हे कळत नाही. त्यांच्या मतदारसंघात मराठा समाजाची जी पोरं आहेत, त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत. शिक्षण मिळणार आहे, सुविधा मिळणार आहेत. त्या मिळू नये म्हणून भुजबळ प्रयत्न करतायेत. जातीयवादी लोक पोसण्याचा अजितदादांचा हा काय प्रकार आहे कळत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच अजितदादांना यासाठी खूप मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. अजितदादा प्रत्येकवेळी प्रचंड मोठी चूक करतायेत. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम अजितदादा करतायेत. का करतायेत हे कळत नाही. मराठा समाजाला आशा होती, अजितदादा असतील, शिंदे आहेत त्यामुळे आरक्षणाला कुठे फाटा बसणार नाही. परंतु आरक्षणाला विरोध करतायेत त्याला मंत्रि‍पदी घेतले जातेय. परंतु कदाचित छगन भुजबळांना हा तात्पुरता आनंद दिला असावा असं वाटते. मराठा आरक्षणाचे मारेकरी यांना अजितदादा मंत्रि‍पदी घेत असतील. जातीजातीत टोळी निर्माण करणाऱ्यांना मंत्रिपद दिले जात असेल तर मराठ्यांना यापुढच्या काळात एकजूट व्हावे लागणार आहे. आमदार, मंत्र्‍यांसह सर्व मराठा समाजाच्या पोरांना आरक्षणाची गरज आहे. अजितदादा जाणीवपूर्वक असं का करतायेत करत नाही. कदाचित जिल्हा परिषदा निवडणुका असतील त्यामुळे तात्पुरता आनंद दिला असेल. त्यानंतर त्यांच्या आनंदावर शंभर टक्के विरजन पडेल अशी शंका आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

वापरून फेकून देणारा माणूस फडणवीस

दरम्यान, अजितदादांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अजितदादांच्या आमदारांनी विरोध करायला हवा होता. त्यांच्या मतदारसंघातही  मराठा समाज मोठा आहे. हा डाव देवेंद्र फडणवीसांचा असू शकतो. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यासाठी गोंजारण्याचे काम केले असेल. मराठा संपवण्याचा विडा फडणवीसांनी घेतला आहे हे सर्व पक्षातील मराठा आमदारांना कळणे गरजेचे आहे. आमदारकी, मंत्रि‍पदे मिळाली म्हणून ते मान्य करणार नाहीत. परंतु त्यांच्या मनात मात्र हे खरे आहे असं म्हणत असतील. ज्या माणसाने फडणवीसांना पुन्हा प्रवाहात आणले त्या शिंदेंनाही वापरून बाजूला केले. काम झाले की वापरून फेकून देणारा माणूस फडणवीस आहे अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.  
 

Web Title: Manoj Jarange Patil got angry as soon as Chhagan Bhujbal returned to the cabinet; gave a telling warning to Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.