"महायुती सरकार पळपुटे, अडचणीत येईल म्हणून अधिवेशन गुंडाळून पळ काढतंय"; विरोधकांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:49 IST2025-07-09T16:49:19+5:302025-07-09T16:49:47+5:30
Mill Workers News: गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहण्याचा व्यक्त केला निर्धार

"महायुती सरकार पळपुटे, अडचणीत येईल म्हणून अधिवेशन गुंडाळून पळ काढतंय"; विरोधकांचा हल्लाबोल
गिरणी कामगारांच्या वतीने आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे आझाद मैदानात उपस्थित राहिले. या मोर्चाला संबोधित करताना जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
"मुंबईत जवळपास ७६ एकर जागा उपलब्ध आहे. मात्र सरकार गिरणी कामगारांना मुंबईतून विस्थापित करून दूर शेलू आणि वांगणीला पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. गिरणी कामगारांना हे मान्य नाही. त्यामुळे त्यांचा गोष्टीला प्रचंड विरोध आहे. सरकार यावर तोडगा काढत तर नाहीच. उलट शेलू, वांगणीला घर नाकारल्यास कामगारांना घरांचा हक्क राहणार नाही असं म्हणत आहेत. त्यामुळे हे पळपुटे सरकार आहे. अडचणीत येईल म्हणून अधिवेशनही गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे," अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर गिरणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडेल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर संभ्रमावस्था आहे. त्या लोकांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर कार्यरत असणाऱ्या १४ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून लाँग मार्च काढला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या सहयोगाने गृहनिर्माण योजना लागू केली होती. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार, असेही जयंत पाटील म्हणाले.