"राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या आणि…’’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:45 IST2025-10-01T16:44:27+5:302025-10-01T16:45:07+5:30
Maharsahtra Flood News: अतिवृष्टी आणि संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांनी ५० हजार रुपये एवढी तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

"राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या आणि…’’, काँग्रेसची मागणी
मुसळधार पावस आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे मराठवाड्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर पुराच्या पाण्यामुळे शेतातील सुपिक मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांनी ५० हजार रुपये एवढी तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
राज्यातील अतिवृष्टी व महापुरावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकरी हवालदिल आहे, पिकं नष्ट झाली आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे, त्यांना तात्काळ मदत देणे गरजेचे आहे पण सर्वे व पंचनाम्याच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करत आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, तर जमीन खरडून गेली आहे त्यापोटी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत. महायुतीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ असून दिवाळी पूर्वी कर्जमाफी करावी असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेचा आज वर्धा जिल्ह्यात प्रवेश झाला. तिसऱ्या दिवशीची पदयात्रा खडकीपासून सुरू होऊन लालवानी, वर्धा येथे पोहचणार आहे. या यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या २ ऑक्टोबर रोजी ही पदयात्रा सेवाग्राम आश्रमात दाखल होत आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु असलेल्या या पदयात्रेत माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेस नेत्या चारुलता टोकस, शेखर शेंडे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत मोहोड, राजेंद्र तिडके, संदेश सिंघलकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, कराळे गुरुजी, शैलेश अग्रवाल, फिरोज मिठीबोरवाला, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) यांच्यासह स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.