Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:42 IST2025-07-18T11:41:15+5:302025-07-18T11:42:26+5:30
Devendra Fadnavis on Cast Certificate: चुकीच्या पद्धतीने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला.

Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच मिळू शकतो. इतर धर्मीयांनी चुकीच्या पद्धतीने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले असेल, तर अशा प्रकरणात संबंधितांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत म्हटले. शिवाय, कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर करता येणार नाही, याची तरतूद करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
विधान परिषद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे घटनेला धरून नाही. केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच जातीचे प्रमाणपत्र मिळू शकते. अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी स्पष्ट केले आहे", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे फडणवीस म्हणाले की, "जर कोणी चुकीच्या पद्धतीने जातीचे प्रमाणपत्र मिळवले असतील तर संबंधितांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येतील. शिवाय, जातीच्या प्रमाणपत्राद्वारे नोकरी किंवा काही लाभ मिळवले असतील, त्याचीही वसूली केली जाईल, फसवणूक, दबाव किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई केली जाईल", असाही इशारा देण्यात आला.