महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 01:52 PM2019-11-04T13:52:19+5:302019-11-04T13:57:32+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपाला वारंवार लक्ष्य करणाऱ्या संजय राऊतांवर घणाघाती टीका

Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena chief uddhav thackeray should keep check on sanjay raut says ravi rana | महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'

Next

मुंबई: राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल देऊनही अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या वाटपावरून संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्षांमधील संवाद जवळपास संपुष्टात आला असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार भाजपाला लक्ष्य करत आहेत. यावरून अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जोरदार बॅटिंग करत संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. 

संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे पोपट आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर अंकुश ठेवावा, असं रवी राणा यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेला भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे त्यावेळी ठरलेल्या फॉर्म्युल्याची या तीन नेत्यांना कल्पना आहे. मात्र संजय राऊत गरज नसताना दररोज भाजपावर टीका करत आहेत. शिवसेनेनं भाजपासोबत निवडणूक लढवली. भाजपाबरोबर युती केल्यानंच त्यांच्या 56 जागा निवडून आल्या. अन्यथा त्यांना 25 चा आकडादेखील गाठता आला नसता, अशा शब्दांत राणा यांनी राऊत आणि शिवसेनेचा समाचार घेतला. 

विधानसभा निवडणूक भाजपासोबत लढलेली शिवसेना आज कोणत्या प्रकारचं राजकारण करतेय, हे राज्यातील जनता पाहतेय. ही जनताच पुढे शिवसेनेला धडा शिकवेल, असंदेखील राणा म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेला विरोधी पक्षात बसण्याचंदेखील आव्हान दिलं. हिंमत असेल तर शिवसेनेनं विरोधी पक्षात बसावं. दोन महिन्यांत त्यांचे 20 ते 25 आमदार पक्षातून बाहेर पडतील. कारण शिवसेनेतील बहुतांश आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत. या आमदारांना मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत आवडते, असंदेखील ते म्हणाले.

शिवसेनेचे 20 ते 25 आमदार सध्याच्या घडीला मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला. 'गेल्या 5 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं. त्यांनी राज्याची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली. त्यामुळे पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील,' असं राणा म्हणाले. आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासह आज राज्यपालांची भेट घेतली. 
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena chief uddhav thackeray should keep check on sanjay raut says ravi rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.