Maharashtra Vidhan Sabha 2019 Who will get the power | Vidhan Sabha 2019: कोण होणार महाराष्ट्राचे ‘कारभारी’?

Vidhan Sabha 2019: कोण होणार महाराष्ट्राचे ‘कारभारी’?

महाराष्ट्र... छत्रपतींचा वारसा सांगणारे हे राज्य देशाच्या राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहे. अगदी स्थापनेपासून महाराष्ट्र हे काँग्रेसचा गड म्हणून ओळखले गेले. पुढे आघाडीच्या धर्मात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाराष्ट्रावर अनेक वर्षे सत्ता गाजविली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या अभेद्य बालेकिल्ल्याला धडका देण्याचा शिवसेना-भाजपने अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र, एक अपवाद वगळता हा गड काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्याकडेच ठेवला. २०१४ मध्ये मोदी लाटेत मात्र भाजप-सेनेने या गडावर भगवा फडकवित प्रस्थापित सुभेदारांची सद्दी संपविली. २०१९ च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून, महाराष्ट्राची ‘सुभेदारी’ परत मिळविण्यासाठी देवेंद्र फडणवीस निकराचे प्रयत्न करीत आहेत; तर शिवसेनाही या ‘सुभेदारी’साठी आसुसली आहे. तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मावळ्यांनाही सुभेदारीची स्वप्नं पडू लागली आहेत. महाराष्ट्राचा ‘सुभेदार’ कोण असेल याचा फैसला मात्र मतदारराजाच करणार आहे.

नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी
वसंतराव नाईक हे तब्बल ११ वर्षे ७७ दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिले आहेत. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी ७ वर्षे १२३ दिवस हे पद सांभाळले आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही ६ वर्षे १२३ दिवस मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून राज्याचा कारभार हाकला आहे. नाईक हे सलगपणे या पदावर कार्यरत होते.

वसंतदादा, शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री
वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांनी वेगवेगळ्या कार्यकाळात प्रत्येकी चार वेळा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे, शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पिता-पुत्रांनीही प्रत्येकी दोन वेळा मुख्यमंत्रिपद पटकावले होते; तर विलासराव देशमुख यांनीही हे पद दोन वेळा सांभाळले आहे.

राणेंना मिळाले २५८ दिवसच मुख्यमंत्रिपद
नारायण राणे यांना अवघे २५८ दिवसच या पदावर राहता आले, तर शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनाही २७६ दिवसच मुख्यमंत्रिपदाचा मुकुट परिधान करता आला. युती सरकारच्या शेवटच्या काळात राणे यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आले होते; तर परीक्षेत मुलीचे गुण वाढवल्याचा आरोप झाल्याने शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले.

हे माजी मुख्यमंत्री राजकारणात सक्रिय
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंत १७ मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार हाताळला आहे. यातील नऊ माजी मुख्यमंत्री सध्या हयात नाहीत; तर शरद पवार, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राजकारणात आजही सक्रिय आहेत. मनोहर जोशी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली नसली तरी ते राजकारणापासून काहीसे अलिप्त आहेत.

पश्चिम महाराष्ट्राने दिले सहा मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सर्वाधिक वेळा पश्चिम महाराष्ट्राकडे राहिले आहे. पश्चिम महाराष्ट्राने तब्बल सहा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले आहेत. यात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाबासाहेब भोसले, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश आहे. कोकणातून नारायण राणे आणि बॅ. ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्रिपद पटकाविले होते. मराठवाड्यातील शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण या चौघांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती. विदर्भातही मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस या चौघांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे मुंबईतून मनोहर जोशी हे एकमेव मुख्यमंत्रिपदी राहिले आहेत.

विरोधी पक्षनेतेच गेले सत्ताधारी पक्षात
सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता खमक्या असावा लागतो, असे म्हणतात. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. २००५ मध्ये नारायण राणे यांनीही विरोधी पक्षनेते असताना सत्ताधारी काँग्रेसचा ‘हात’ पकडला होता. त्यानंतर त्यांचा लगेचच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे १९८५ मध्ये शरद पवार हे समाजवादी काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षनेते होते. त्यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून सत्तेचा मार्ग चोखाळला होता. २०१४ मध्ये सेनेचे एकनाथ शिंदे यांनीही अल्पकाळ विरोधी पक्षनेत्याची भूमिका वठवली होती. त्यानंतर सेनेने सत्तेत वाटा मिळविल्याने शिंदे मंत्री बनले.

दोन वेळा राष्ट्रपती राजवट
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी १९८० ते ९ जून १९८० या ११२ दिवसांच्या कालावधीत राज्यात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बहुमतात असतानाही ते बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली गेली, तर २८ सप्टेंबर २०१४ ते ३० आॅक्टोबर २०१४ या कालावधीत दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले. निवडणुका तोंडावर असल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची संधी न देता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.

आबा, पतंगरावांची उणीव
राज्याच्या राजकारणातील आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांचे योगदान संस्मरणीय आहे. आपल्या मृदू स्वभावाने सहजपणे जनतेची मने जिंकणारे स्व. आर. आर. पाटील यांची उणीव १४ व्या विधानसभेला जाणवणार आहे. पूर्वीचा तासगाव आणि आताच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून आर. आर. यांनी सहा निवडणुका लढविल्या. विशेष म्हणजे या सहाही निवडणुकांत त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. २०१४ च्या मोदी लाटेतही आर. आर. यांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवला होता; तर आपल्या रांगड्या बोलीने स्वपक्षीयांसह विरोधकांनाही आपलेसे करणाºया पतंगराव कदम यांची खुमासदार भाषणे १४व्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ऐकायला मिळणार नाहीत. पूर्वीचा भिलवडी-वांगी आणि आताचा पलूस-कडेगाव या विधानसभा मतदारसंघातून पतंगरावांनी पोटनिवडणुकीसह तब्बल नऊ निवडणुका लढविल्या. यात त्यांनी सहा वेळा विजय मिळविला, तर तीन वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचीही उणीव विधिमंडळाला जाणवणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातून त्यांनी दोनवेळा विजय संपादन केला होता.

विधान भवनात नसतील गणपतराव...
शेतकरी, कामगार आणि वंचित घटकाच्या प्रश्नावर तळमळीने बोलणारे, राज्याच्या स्थापनेपासून प्रत्येक घडामोडीचा साक्षीदार राहिलेले एक स्वच्छ राजकारणी म्हणजे गणपतराव देशमुख. सांगोला (जि. सोलापूर) विधानसभा मतदारसंघातून विक्रमी ११ वेळा प्रतिनिधित्व केलेल्या आणि सर्वांत वयोवृद्ध (९३ वर्षे) आमदार म्हणून ओळखल्या जाणाºया गणपतराव देशमुख यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा नितळ राजकारणी यापुढे विधान भवनात दिसणार नाही. गणपतराव यांनी १३ निवडणुका लढविल्या. यात त्यांना दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला.

एकाच घरात दोन व्यक्तींना मुख्यमंत्रिपद
राजकारणातील घराणेशाही नवी नसली तरी राज्यातील दोन मातब्बर घराण्यांना दोन वेळा मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. यात नाईक घराणे, पुसद (जि. यवतमाळ) आणि चव्हाण (नांदेड) यांना हा बहुमान मिळाला आहे. शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण, तर वसंतराव नाईक आणि त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

मराठा समाजाला मिळाले सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व
महाराष्ट्रात आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सर्वाधिक वेळा मराठा समाजाकडेच गेली आहे. राज्यातील १७ पैकी तब्बल १० मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झाले आहेत.
यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, बाबासाहेब भोसले, नारायण राणे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या मराठा समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.
हंगामी मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलेले कोकणातील पी. के. सावंत हेही मराठाच होते. विशेष म्हणजे तुलनेने अल्पसंख्याक असलेल्या बंजारा समाजातील वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या दोघांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
बॅरिस्टर अंतुले यांच्या रूपाने आतापर्यंत एकमेव मुस्लीम मुख्यमंत्रीही राज्याला मिळाला आहे. मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ब्राह्मण समाजाने दोन वेळा राज्याचे नेतृत्व केले आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून दलित समाजालाही प्रतिनिधित्व मिळाले आहे.

वसंतराव नाईक, देवेंद्र फडणवीस यांची ५ वर्षे पूर्ण
मुख्यमंत्र्यांची खुर्ची सतत दोलायमान असल्याने ती पूर्ण कार्यकाळ होईपर्यंत टिकविणे तसे जिकिरीचेच... स्वपक्षीयांसह विरोधी पक्षांकडून सतत या खुर्चीला हादरे दिले जात असतात. मात्र, राज्यात आतापर्यंत वसंतराव नाईक आणि देवेंद्र फ डणवीस या केवळ दोनच मुख्यमंत्र्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे. विशेष म्हणजे, हे दोघेही विदर्भातील आहेत. यवतमाळच्या वसंतराव नाईक यांनी आपल्या दुसºया टर्ममध्ये १ मार्च १९६७ ते १३ मार्च १९७२ हा पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, तर देवेंद्र फ डणवीस यांनीही ३१ आॅक्टो. २०१४ पासून सुरू झालेला कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

या जिल्ह्यांना मिळाले नाही मुख्यमंत्रिपद
राज्याचे नेतृत्व करण्याची संधी अद्यापपर्यंत राज्यातील २३ जिल्ह्यांना मिळालेली नाही. कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर, नाशिक, धुळे, वर्धा, गडचिरोली, अमरावती, जळगाव, नंदुरबार, ठाणे, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम, भंडारा, हिंगोली, गोंदिया या जिल्ह्यांतून अद्याप एकही मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला नाही; तर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, लातूर, यवतमाळ, मुंबई महानगर, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांनी नेतृत्व केले आहे.

हे दिग्गज असतील रिंगणात
देवेंद्र फडणवीस (भाजप) नागपूर । अजित पवार (राष्ट्रवादी) बारामती । पंकजा मुंडे (भाजप) परळी । धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) परळी । सुधीर मुनगंटीवार (भाजप) बल्लारपूर । जयंत पाटील (राष्ट्रवादी) इस्लामपूर । एकनाथ शिंदे (शिवसेना) ठाणे । एकनाथ खडसे (भाजप) मुक्ताईनगर । गिरीश महाजन (भाजप) जामनेर । हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) कागल । राधाकृष्ण विखे (भाजप) शिर्डी । बाळासाहेब थोरात (काँग्रेस) संगमनेर । विजय वडेट्टीवार (काँग्रेस) ब्रह्मपुरी । पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) कºहाड द. । हर्षवर्धन पाटील (भाजप) इंदापूर । अमित देशमुख (काँग्रेस) लातूर । प्रणिती शिंदे (काँग्रेस) सोलापूर । सुभाष देशमुख (भाजप) सोलापूर दक्षिण.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Who will get the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.