Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 16:53 IST2025-08-18T16:48:04+5:302025-08-18T16:53:43+5:30
Rain Alert Maharashtra: जुलैमध्ये पाऊस उघडला. त्यानंतर मध्ये बराच काळ गेला आणि गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडतोय... काय आहे कारण?

Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
Mumbai Maharashtra Weather: महाराष्ट्राची राजधानी अक्षरशः पावसाच्या तावडीत सापडलीये. इतर भागातही मुसळधार पाऊस पडतोय. अनेक भागांत नद्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणची धरणे भरली आहेत. गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र चिंब चिंब झालाय. पण, विश्रांतीनंतर अचानक इतका पाऊस पडायला का लागला आहे?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली आहे. मागील सहा-सात दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस पुढील आणखी काही दिवस मुक्काम ठोकण्याचा अंदाज आहे.
मुंबई, महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतोय?
मुंबई महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागात पाऊस पडण्याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन डिप्रेशन झाल्यामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे. त्याचबरोबर मान्सूनही सक्रिय झाला आहे. पूर्व-पश्चिम अशी द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही कोकण ते उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस होताना दिसत आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर वाढलेला असून, ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः कोकण, पश्चिम घाटमाथ्याचा परिसर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
सोमवारी राज्यात सर्वदूर पाऊस होता. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना जोरदार तडाखा बसला. १९ ऑगस्ट रोजीही धाराशिव, सोलापूर हे जिल्हे वगळता इतर सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मुंबई, पुणे, नाशिकला रेड अलर्ट
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, रायगड या जिल्ह्यांना अतिसतर्कतेचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.
📢 मुंबई महानगरासाठी दिनांक १८ ऑगस्ट व १९ ऑगस्ट २०२५ रोजी रेड अलर्ट
🔴 भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगरासाठी (मुंबई शहर व उपनगरे) दिनांक १८ ऑगस्ट व १९ ऑगस्ट २०२५ असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे.
⚠🌧 या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, आवश्यक नसेल… pic.twitter.com/SNmh0CwMNZ— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2025
या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, इतर भागातही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.