Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 07:55 IST2025-09-15T07:53:11+5:302025-09-15T07:55:11+5:30

Maharashtra Rain Alert: शुक्रवारपासून राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असून, सोमवारीही (१५ सप्टेंबर) संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra rain: Today is a rainy day, will hit the entire Maharashtra; Orange alert for four districts | Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert Today: विश्रांतीनंतर पाऊस सुरू झाला असून, मागील दोन दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात संततधार सुरूच आहे. आज (१५ सप्टेंबर) दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

मान्सूनने परतीची वाट धरली असून, त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारपासून राज्यात पावसाची रिपरिप सुरू असून, रविवारी दुपारपासून अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. 

हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे, पुढील ३ तासांत राज्यातील अहिल्यानगर, बीड, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांतील काही ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे.  

चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 

पुढील २४ तासांत कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पुणे, सातारा घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या चारही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

मुंबईत पावसाचा जोर वाढला

रविवारी रात्रीपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाला सुरूवात झाली. पाऊस सुरूच असून, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईतील सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. 

१६ सप्टेंबरलाही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

मुंबई, ठाणे, पालघर वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त असण्याचा अंदाज आहे. 

Web Title: Maharashtra rain: Today is a rainy day, will hit the entire Maharashtra; Orange alert for four districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.