'त्यांनी साद घातली तर प्रतिसाद देणार', ठाकरेंकडे परतण्याबाबत शंभूराज देसाईंचे मोठे विधान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 20:04 IST2023-07-04T20:03:52+5:302023-07-04T20:04:15+5:30
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे.

'त्यांनी साद घातली तर प्रतिसाद देणार', ठाकरेंकडे परतण्याबाबत शंभूराज देसाईंचे मोठे विधान...
Maharashtra Political Crisis News: राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या येण्याने भाजपसोबत असलेला शिंदे गट (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. यातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
2019 मध्ये राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळवून दिले. पण, काही घटना अशा घडल्या की, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यानंतर, गेल्यावर्षी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रामुख्याने अजित पवारांवर टीका करत बंड केले आणि भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. या सरकारला काही दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झाले. पण, आता कट्टर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसही सरकारमध्ये सामील झाली आहे. यामुळे शिंदे गट नाराज असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की, जर उद्धव ठाकरे यांनी बोलावले, तर त्यांच्याकडे परत जाल का? यावर ते म्हणाले की, "हा जर तरचा प्रश्न आहे. ज्यावेळी त्यांच्याकडून हाक येईल तेव्हा साद दिली जाईल. त्यांच्याकडून तशी साद आली तर आम्हीही सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ. जर तुम्हाला कोणी साद घातली की आपण एकदम धुडकाऊन लावत नाही. याबाबत विचार करणारा मी एकटा नाही. पक्षाचे नेते मंडळी, वरिष्ठ मंडळी आहेत," असे मोठे विधान शंभुराज देसाई यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात आपल्याला नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.