Maharashtra Politics : सरकारविरोधात लढण्याची जयंत पाटलांमध्ये धमक आहे का?; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 09:33 IST2024-12-25T09:30:50+5:302024-12-25T09:33:10+5:30
Maharashtra Politics : आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics : सरकारविरोधात लढण्याची जयंत पाटलांमध्ये धमक आहे का?; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला
Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुती सत्तेत आली. जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठा विजय मिळवला. विजयानंतर काल आमदार गोपीचंद पडळकर यांची आटपाडीत जाहीर सभा झाली, या सभेत पडळकर यांनी महाविकास आघाडी आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
महाविकास आघाडीमध्ये आता सरकार विरोधात लढण्याची हिंमत नाही, अशी टीका त्यांनी केली. आमदार पडळकर म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना आमचे १०५ आमदार होते. एकही आमदार देवा भाऊ यांच्या पाठिमागून हटला नाही. कारण भाजपाचा कार्यकर्ता विचारावर काम करतो. तो संधी साधू असू शकत नाही, आता महाविकास आघाडीची सत्ता गेली. कोणाच्यात सरकार विरोधात लढण्याची हिंमत आहे का? जयंत पाटील यांच्यात लढण्याची हिंमत आहे का?, असा टोला पडळकर यांनी लगावला.
पडळकर म्हणाले, जयंत पाटील यांचे २०१९ भाषण पुन्हा ऐका. देवाभाऊ म्हणाले होते मी पुन्हा येईन. त्याच्यावर त्यांनी कसं भाषण केले होते. आता तुम्ही नागपुरातील भाषण ऐकले का? लढणे हे रक्तात असावे लागते. ही लोक लगेच वळचणीला पळतेत, लढू शकत नाहीत. त्यांच्यात हिंमत नाही. वळचणीला कोण जात असतं, वाघ कधी वळचणीला जात नाही. तो नेहमी रस्त्यावर समोर येत असतो, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली.
"देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता आपल्याला काम करायचे आहे. आता मध्ये एकदा जयंत पाटील येणार अशी चर्चा होती. पाालकमंत्री होणार असं बोलत होते. ते आले तर येऊदे काय होतंय. ते याआधीही पालकमंत्री होते, तेव्हा ते आमच्या मित्रांना गोपीचंद पडळकर बैठकीला येणार आहेत का? असं विचारत होते, आता आपले पण दिवस येत आहेत. कशाला एवढा विचार करत आहात. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे, असंही पडळकर म्हणाले.