राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:52 IST2025-10-13T20:48:57+5:302025-10-13T20:52:46+5:30
Monkeypox: महाराष्ट्रात धोकादायक आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
राज्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आली आहे. हा रुग्ण सौदी अरेबियातून धुळ्यात आला. त्वचेसंबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने धुळे शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे या रुग्णाच्या तीन रक्त चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या अहवालातून त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण २ ऑक्टोबर २०२५ रोजी सौदी अरेबियातून धुळ्यात आला. मात्र, त्यानतंर त्वचेसंबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील एनआयए प्रयोगशाळेने या चाचण्यांचा अहवाल दिल्यानंतर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
हा आजार सुरुवातीला आफ्रिकेतून पसरला, पण तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. कोणत्याही आजाराबाबत भीती न बाळगता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे यांसारखी लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.