Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 20:43 IST2026-01-02T20:39:20+5:302026-01-02T20:43:08+5:30
Maharashtra Municipal Corporation Election: राज्यात २९ महानगरपालिकेसाठी मतदान होणार असून त्याआधीच महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे

Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम सध्या शिगेला पोहोचला आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने विरोधकांना मोठा धोरणात्मक धक्का दिला आहे. राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये महायुतीचे तब्बल ६४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ४४ आणि शिंदेसेनेचे १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महायुतीचा हा मास्टरस्ट्रोक चर्चेचा विषय ठरला असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे यश नेमके कसे मिळाले, यावर स्वतः भाष्य केले आहे.
निवडणुकीपूर्वीच एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामागचे कारण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, "ज्या ठिकाणी विरोधी पक्षातील उमेदवारांना खात्री पटते की, समोरचा महायुतीचा उमेदवार आपल्या कामाच्या जोरावरच निवडून येणार आहे, अशा ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इतर अपक्ष उमेदवारांनी स्वतःहून माघार घेतली आहे. आमच्या उमेदवारांचे काम बोलते. गेल्या काही काळात महायुती सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचलेला विकास, याचीच ही पोचपावती आहे. जनतेचा पाठिंबा कोणाला आहे, हे इतर पक्षातील उमेदवारांना आता कळून चुकले आहे. त्यामुळेच बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या यावेळी वाढली आहे."
कल्याण-डोंबिवलीसह अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीने सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतल्याने, उर्वरित जागांसाठी होणाऱ्या मतदानावर याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.