Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 21:29 IST2026-01-02T21:25:50+5:302026-01-02T21:29:05+5:30
Sanjay Raut On Mahayuti Victories: राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुतीने बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला असला तरी, या विजयावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे.

Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुतीने बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला असला तरी, या विजयावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्वीट करत महायुतीवर झुंडशाहीचे गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारांना पाच-पाच कोटींची लाच देणे आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, असे उद्योग करून ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाच्या जोरावर आणि विश्वासापोटी उमेदवार बिनविरोध झाले, असा दावा केला होता. मात्र, संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ पैशांचा वापर आणि सरकारी यंत्रणेचा धाक दाखवून हे विजय मिळवले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.
::सरकारी यंत्रणेचा संपूर्ण गैरवापर ::
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 2, 2026
———-////——-///————
रात्री कितीही वाजेपर्यंत माघारीचा अर्ज आणून दिल्यास तो तीन वाजेच्या आत आणून दिलेला आहे असे समजून माघार नोंदवावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या प्रक्रियेत असलेला माझा एक मित्र आत्ताच मला…
संजय राऊत म्हणाले की,"रात्री कितीही वाजेपर्यंत माघारीचा अर्ज आणून दिल्यास तो तीन वाजेच्या आत आणून दिलेला आहे, असे समजून माघार नोंदवावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत असलेला माझा एक मित्र आत्ताच मला फोनवर बोलला की, त्याने असे करणे चुकीचे होईल असे म्हणाल्यावर त्याला लगेच पालकमंत्र्यांचा फोन आला आणि आमचे स्थानिक आमदार काय सांगतात त्याप्रमाणे करा अशी धमकी बजा विनंती त्याला करण्यात आली."
"एका बाजूला आपल्या लोकांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी समोरच्या उमेदवाराना ५-५ कोटी द्यायचे व माघार घ्यायला लावायची आणि दुसऱ्या बाजूला हे असे उद्योग करायचे. लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही चालू आहे. एकदिवस इकडे नेपाळ आणि बांगलादेश प्रमाणे जन उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही!", असाही इशारा संजय राऊतांनी दिला आहे.