Maharashtra Government: Coordinating Committee in congress, NCP and Shiv Sena for ensuring smooth functioning of the state | Maharashtra Government : राज्याचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी समन्वय समिती - सुत्रांची माहिती

Maharashtra Government : राज्याचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी समन्वय समिती - सुत्रांची माहिती

नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु असून लवकरच सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. 

या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची दाट शक्यता आहे. तसेच, राज्याचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी तिन्ही पक्षांकडून एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार, असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते.  

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचा कारभार सुरळीत चालावा, तिन्ही पक्षांमध्ये एकसुत्रता आणण्यासाठी 1 ते 12 सदस्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते असतील, अशी माहिती सुत्रांकडून समजते. 

दरम्यान, आजच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत सत्ता स्थापनेच्या सर्व मुद्द्यांवर एकमत झाले आहे. महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरु आहे. उद्या आम्ही मुंबईला जाऊन घटकपक्षांशी चर्चा करु, त्यांना आतापर्यंत झालेल्या चर्चेची माहिती देऊ, त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करु, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेवर चर्चा करण्यासाठी मॅरेथॉन बैठका सुरू असून, लवकरच महाशिवआघाडीचे सरकार प्रत्यक्ष सत्तेवर येण्याची शक्यता आहे. शिवसेना 14, राष्ट्रवादी 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे देण्याचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचेही सांगण्यात येते. तसेच, शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरले नसल्याचे  पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Government: Coordinating Committee in congress, NCP and Shiv Sena for ensuring smooth functioning of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.