Maharashtra Government congress unaware about ncps letter submitted to governor | Maharashtra Government: राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र पाठवलं, काँग्रेसला नाही समजलं; महाआघाडीतील गोंधळ उघड!
Maharashtra Government: राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र पाठवलं, काँग्रेसला नाही समजलं; महाआघाडीतील गोंधळ उघड!

मुंबई: भाजपा, शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी काल राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली होती. मात्र ती मुदत संपण्याआधीच राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालांनी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळली. मात्र या सर्व घडामोडींपासून काँग्रेस अनभिज्ञ होती. त्यामुळे महाआघाडीतल्या दोन मोठ्या पक्षांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला.

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मतभेद समोर आले होते. यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही काँग्रेसमध्ये फारसा समन्वय नसल्याचं चित्र दिसलं. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेली मुदत आज रात्री ८.३० वाजता संपणार आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं दोन दिवस वाढवून द्यावेत, अशा विनंतीचं पत्र राष्ट्रवादीनं सकाळीच राज्यपालांना दिलं. मात्र याबद्दल काँग्रेसला कोणतीही कल्पना नव्हती. 

शिवसेनेनं पुरेसं संख्याबळ नसल्यानं काल रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजभवनावर बोलावलं. राज्यपालांनी राष्ट्रवादीला बहुमताचा दावा करण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला. राज्यपालांनी रात्री साडे आठपर्यंतची मुदत राष्ट्रवादीला दिली होती. ती मुदत संपेपर्यंत राष्ट्रवादीने जर पत्र दिलं नसतं तर, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली नसती. त्यामुळे घेऊन केंद्र सरकारनं पुढील कार्यवाही करण्याचा प्रश्नच आला नसता.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाबाहेर जायचं होतं. त्याआधी निर्णय घेण्यासाठी दिल्लीत घाई होती. जर आज रात्री साडे आठपर्यंत राष्ट्रवादीनं काहीच कळवलं नसतं, तर राज्यपालांना केंद्रालाही माहिती देता आली नसती. परिणामी आजची केंद्रातली दुपारची तातडीची बैठक झाली नसती. पण राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या स्वाक्षरीचं पत्र राजभवनावर दुपारी देण्यात आलं. ते पत्र हाती येताच राज्यपालांनी त्यावर तातडीनं कार्यवाही केली. हे पत्र दिल्याची कसलीही माहिती काँग्रेसला नव्हती. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रवादीला दिलेली मुदत संपण्याआधीच राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं घटनाविरोधी असल्याचं ट्विट केलं. मात्र आता हे पत्र राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याची माहिती समोर आल्यामुळे काँग्रेस नेतेही बुचकळ्यात पडले आहेत.
 

Web Title: Maharashtra Government congress unaware about ncps letter submitted to governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.