महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 09:07 IST2025-08-20T09:06:43+5:302025-08-20T09:07:12+5:30

नांदेडला सर्वाधिक फटका

Maharashtra flooded...crops damaged, houses submerged; 11 lives lost in Marathwada, Nanded worst hit | महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने मुंबई, कोकणासह विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांना अक्षरश: झोडपून काढले. नदी-नाल्यांना आलेले पूर व जलप्रकल्पांमधून विसर्ग सोडल्याने अनेक जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली गेली आहेत. शहरी भागातील वस्त्याही जलमय झाल्या. पिके खरडून निघाली. विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुलावरून पाणी जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.

मराठवाड्यात ११ जीव गेले, नांदेडला सर्वाधिक फटका

बीड: मागील पाच दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. १४ ते १९ ऑगस्ट या कालावधीत ११ जणांचा जीव गेला आहे. सोबतच ४ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून तब्बल ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला असून, अजूनही सरी बरसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा धरण ओव्हरफ्लो झाले असून, सहा दरवाजे उघडले आहेत. यासह इतरही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला आहे.

४९८ जनावरे दगावली

या पावसात ४९८ जनावरे दगावली आहेत. यात लातूरमध्ये २४५, तर नांदेडमधील १२६ जनावरांचा समावेश आहे. त्यातही गाय, म्हैस अशा दुधाळ जनावरांची संख्या अधिक आहे.

कोणी पुरात तर कोणी धबधब्याखाली बुडाले

पाच दिवसांत तब्बल ११ जणांचा जीव गेला आहे. यात सर्वाधिक ७ जण हे नांदेड जिल्ह्यातील असून बीड व हिंगोलीतील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.

शेतीचे मोठे नुकसान

मराठवड्यातील ८ हजार १६८ हेक्टरवरील बागायत आणि १९८ हेक्टरवर फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत शेती नुकसानीचा आकडा साडेतीन लाख एवढा आहे.

घरांची पडझड, ५८८ जणांचे संसार उघड्यावर

पावसाने ५८८ लोकांचा संसार उघड्यावर आला आहे. पत्रे उडणे, भिंत पडणे अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यातही सर्वाधिक २७५ घटना नांदेड जिल्ह्यात घडल्या असून छत्रपती संभाजीनगर ६३, लातूर ८२, धाराशिव ६४ यांचा समावेश आहे.

पंचनामे कधी करणार?

मराठवाड्यात पावसाने नुकसान झाल्यानंतर अद्यापही प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाही. हा नुकसानीचा अहवाल प्राथमिक असल्याचा दावा केला जात आहे; परंतु प्रत्यक्षात पंचनामे कधी सुरू होणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी देणार? हा प्रश्न आहे

कोल्हापुरातील ८० बंधारे पाण्याखाली,  गगनबावडा मार्ग बंद

कोल्हापूर: जिल्ह्यात सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तब्बल ८० बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तळकोकणाला जोडणारा कोल्हापूर ते गगनबावडा मार्ग बंद झाला आहे. पंचगंगा नदीने ३६ फुटांची पातळी ओलांडली असून, इशारा पातळीकडे (३९ फूट) वाटचाल सुरू केल्याने कोल्हापूरकर धास्तावले आहेत. कर्नाटकातील अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तेथील जलसंपदा विभागाने मंगळवारी विसर्गही एक लाख ७५ हजार क्युसेकपर्यंत वाढवला आहे. ६८ ठिकाणी मालमत्तांची पडझड झाली.

सांगली जिल्ह्यातही जोरधार शिराळ्यात अतिवृष्टी

सांगली: जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू असून, शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. वारणा धरणातून सध्या २९ हजार ९८५ क्युसेकने विसर्ग चालू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढला, दरवाजे ९ फुटांवर

सातारा: जिल्ह्यात धरण क्षेत्रांत पावसाचा जोर असल्याने विसर्ग वाढविला आहे. मोठ्या ६ आणि मध्यम ८ अशा १४ प्रकल्पातून सुमारे ९५ हजार क्युसेक पाणी विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणाचे दरवाजे ९ फुटांपर्यंत वर उचलून पाणी सोडले जात आहे.

वऱ्हाडात ५ दिवसांत २६ जणांचा मृत्यू , ८१८८ घरांची पडझड

अमरावती/अकोला/नागपूर: विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये १४ ते १८ ऑगस्ट या पाच दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे घरे, पिके आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये तब्बल ८१८८ घरांची पडझड झाली आहे. संततधार पावसामुळे अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात प्रकल्प तुडुंब भरले असून, विसर्गामुळे नदी-नाल्यांना पूर आहे.

पाच दिवसांतील हानी

  • २६ तालुक्यांना फटका
  • ७६० गावांमध्ये घरांचे नुकसान
  • २५० जनावरांचा मृत्यू 
  • १२७.५ % अमरावती विभागातील आतापर्यंतचा पाऊस

(विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल)

जिल्हानिहाय मृतांची संख्या

अमरावती विभागात वीज पडून, पुरात वाहून जाणे किंवा पावसाच्या इतर आपत्तीमुळे २६ जणांचा मृत्यू झाला. त्यात यवतमाळमध्ये ११, बुलढाणा ८, अकोला ३, तर अमरावती व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यात  ७० गावे संपर्काबाहेर

गडचिरोली: भामरागडसह ७० गावांचा तुटला संपर्क, नाला ओलांडताना युवक गेला वाहून, १३ मार्ग पाण्याखाली

भंडारा: गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. यवतमाळ : प्रकल्पाचे पाणी सोडल्याने उमरखेड, महागाव तालुके जलमय

वर्धा: पुरात एक व्यक्ती वाहून गेला.

दुधना नदीपुलावरून दुचाकीसह दोघे गेले वाहून

सेलू (जि. परभणी): निम्न दुधना धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वालूर ते सेलू मार्गावरील राजवाडी पुलावरून पाणी वाहत आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजवाडी पुलावरील पाण्यातून दुचाकीने जाणारे दोघेजण दुचाकीसह वाहून गेले.  मारोती हारकळ (४५, रा. वालूर), छबूराव जावळे (५०, रा. गुळखंड) अशी त्यांची नावे आहेत.

कोकणात चिपळूण, राजापुरात पूरस्थिती

रत्नागिरी/सिंधुदुर्ग: रत्नागिरी जिल्ह्यातील सहा मुख्य नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी चिपळूण आणि राजापूर शहरात शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने पाणी ओसरू लागले आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने पूरस्थिती कायम आहे. ग्रामीण व राज्य मार्गावर पाणी आल्याने आणि काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: Maharashtra flooded...crops damaged, houses submerged; 11 lives lost in Marathwada, Nanded worst hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस