मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:30 IST2025-09-30T14:29:17+5:302025-09-30T14:30:23+5:30
Maharashtra Flood Relief: सगळी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात मिळाली पाहिजे असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
मुंबई - राज्यात ६० लाख हेक्टरचं नुकसान अतिवृष्टीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने २ हजार २१५ कोटी रूपये वितरित करणे सुरू केले आहे. ज्या ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे त्याबाबत सामुहिक धोरण तयार करू आणि पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू. ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या काही महिन्यात सातत्याने महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही आढावा घेतला. जवळपास ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले त्यासाठी २ हजार २१५ कोटी रूपये राज्य सरकारने वितरीत करणे सुरू केले आहे. ई-केवायसीची अट रद्द करून शेत नोंदीप्रमाणेच ही मदत होईल. पुढच्या २-३ दिवसांत सगळ्या प्रकारची माहिती आमच्याकडे पोहचेल. काही ठिकाणी पाणी असल्याने योग्य आकडेवारी घेता येत नव्हती. तिथे आपण अधिकचा वेळ दिला आहे. २-३ दिवसांत ही माहिती पोहचेल. त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत, जमीन खरडून गेलेली असेल त्याकरता मदत, विहिरींसाठी मदत, घरांची मदत असेल अशा वेगवेगळ्या नुकसानीबाबत सर्वसमावेशक धोरण आखून आम्ही मदत करणार आहोत असं त्यांनी सांगितले.
🕑 1.59pm | 30-9-2025📍Mumbai.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 30, 2025
LIVE | Media Interaction#Maharashtra#Mumbaihttps://t.co/iUTwGLVJ9T
तसेच सगळी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात मिळाली पाहिजे असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होते. परंतु धोरणात कुठेही ओला दुष्काळाचा उल्लेख नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र ज्या वेळी दुष्काळ पडतो तेव्हा ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती यावेळी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. नुकसानाची आकडेवारी जमा झाल्यानंतर लवकरात लवकर याबाबत मदतीची घोषणा करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, दिल्लीतून आपल्याला पूर्ण मदत होणार आहे. त्यासाठी आपला प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. परंतु दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता लागेल ती मदत आपण देतोय. त्याची भरपाई दिल्लीतून नंतर केली जाईल. केंद्राला एक प्रस्ताव पाठवता येतो, वारंवार पाठवता येत नाही. त्यामुळे संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर एक प्रस्ताव पाठवला जाईल असंही केंद्र सरकारच्या मदतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.