Maharashtra Election, Maharashtra Government: After the Congress-NCP's meeting yesterday, Sanjay Rauta targeted BJP | Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीनंतर संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा 

Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीनंतर संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा 

मुंबई- राज्यात शिवसेना-भाजपाचा वाद विकोपाला गेलेला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसुद्धा शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यास तारीख पै तारीख देत असल्यानं भाजपाही त्याचा फायदा उचलत शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवून शिवसेनेसह सरकार स्थापन करण्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बुधवारी चर्चेनंतर एकमत झाल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्याकडे साडेतीन तास झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांत ठरलेला किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्वीकारण्यावर व सत्तावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊतांनी ट्विट करत पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.

हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था..!!, अशा ट्विटमधून त्यांनी भाजपाला उपरोधिक टोला लगावला आहे. तत्पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने नेते खा. संजय राऊत यांनी आता पेढ्यांची ऑर्डर द्यायला हरकत नाही, असे सांगून गोड बातमी लवकरच येईल, असे स्पष्ट केले.

नंतर ते शरद पवार यांना भेटायला गेले. पण त्यापूर्वी त्यांनी ‘उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी महाराष्ट्राची इच्छा आहे’, असे सांगतानाच, ‘शिवतीर्थावर शपथविधी होईल, तेव्हा तुम्हाला नाव कळेलच’, असेही नमूद केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच महाशिवआघाडीचं सरकार सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. 
काल झालेल्या या बैठकीला काँग्रेसतर्फे अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, व माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, नवाब मलिक, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, आमची चर्चा सकारात्मक होती आणि राज्यात लवकरच नवे सरकार स्थापन होईल. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेसह आम्ही दोघे पक्ष सरकार स्थापन करू, असे स्पष्टपणे सांगितले. राज्यात 30 नोव्हेंबरपूर्वी तिन्ही पक्षांचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या चर्चेमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट लवकरच संपुष्टात येईल, असे दिसू लागले आहे.
या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय असावा, सत्तेचे वाटप कसे करावे, अधिकारी वर्ग कायम ठेवावा की बदलावा यांसह अनेक बारीकसारीक मुद्यांवर चर्चा झाली. ही चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे. मात्र रात्रभरातच चर्चेद्वारे सर्व मुद्दे निकालात काढून येत्या दोन दिवसांत शिवसेनेशी बोलणी केली जातील, असे कळते. मंत्रिपदांच्या वाटपावर स्पष्टता झालेली नाही. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 14 व काँग्रेसचे 12 मंत्री असतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. शिवसेनेने सर्व आमदारांना शुक्रवारी पॅन, आधार कार्ड, आदी पुराव्यासह मुंबईत बोलावले आहे. त्यांना तीन-चार दिवस राहण्याच्या तयारीने येण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होताच राज्यपालांना भेटण्याचा शिवसेनेचा इरादा असल्याचे समजते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: After the Congress-NCP's meeting yesterday, Sanjay Rauta targeted BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.