Maharashtra Election 2019 Why pm Modi cm Fadnavis are not talking about economy ask congress leader Rahul Gandhi | Maharashtra Election 2019: मोदी, फडणवीस अर्थव्यवस्थेवर का बोलत नाहीत?; राहुल गांधींचा सवाल
Maharashtra Election 2019: मोदी, फडणवीस अर्थव्यवस्थेवर का बोलत नाहीत?; राहुल गांधींचा सवाल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार फक्त 15-20 उद्योगपतींची चौकीदारी करत आहे. सर्वसामान्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून जनतेच्या खिशातील पैसा विजय माल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या घरात गेला. देशातील उद्योगधंदे बंद पडत आहेत. मात्र मोदी, देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्थेवर बोलण्यास अजिबात तयार नाहीत, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी लगावला. धारावी येथील 90 फूट रस्त्यावर आयोजित पक्षाच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

राहुल म्हणाले,  नोटबंदीमध्ये सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागले. मात्र अदानी,  अंबानी रांगेत उभे होते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लघु, मध्यम उद्योग बंद पडत आहेत. धारावीतील युनिट बंद पडत आहेत. मात्र सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही. गब्बर सिंह टॅक्समुळे (जीएसटी) फायदा झालेला एकतरी व्यापारी तुमच्या नजरेत आहे का ? सरकारने अनेक कायदे बदलले. मात्र जीएसटी कायदा बदलण्यास ते तयार नाहीत. अर्थव्यवस्थेची अवस्था अशीच राहिली, तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. 

बेरोजगार तरुण, शेतकरी, त्रासलेली जनता सरकारकडे न्याय मागत आहे त्यांना न्याय मिळाला नाही तर हा वर्ग सरकारकडून झगडून न्याय मिळवेल. देशाचे भविष्य बदलण्याची ताकद मूठभर उद्योगपतींमध्ये नाही, तर सर्वसामान्य तरुण,  शेतकरी, लघु व मध्यम उद्योजक यांच्यामध्ये आहे. त्यांच्या हातात घातलेली अडचणीची बेडी काढल्यास चमत्कार होईल. मात्र हे करण्याची विद्यमान सरकारची क्षमता नाही. हे काम काँग्रेसच करु शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस खोटी आश्वासने देत नाही. सरकारने कर्जमाफी केल्याचा दावा केला होता. मात्र तुमच्यापैकी कुणाचे कर्ज माफ झाले आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर कुणाचेही नाही असे उत्तर उपस्थितांमधून आले. पैसा गोरगरीबांचा व त्यातून अदानी,  अंबानी मौजमजा मारतात असा आरोप त्यांनी केला. 

मोठ्या उद्योगपतींना लाखो कोटी रुपये देण्याऐवजी लहान उद्योजकांना निधी उपलब्ध करुन दिल्यास अर्थव्यवस्था अधिक बळकट होऊ शकेल असे ते म्हणाले. देशातील सर्वसामान्य पुढे जातील तेव्हाच खऱ्या अर्थाने देश पुढे जाईल. छोटे दुकानदार, लघु ,मध्यम उद्योजकांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  

काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले हा प्रश्न मोदी नेहमी  विचारतात. पाच वर्षांत जीएसटी, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान मोदींच्या सरकारने केले. ते कॉंग्रेसने केले नाही असा पलटवार त्यांनी केला. मेक इन इंडियाची घोषणा करणाऱ्यांनी मेक इन धारावीकडे दुर्लक्ष केले. धारावी गरिबांची शक्ती आहे. प्रत्येक शहरात धारावी आहे. तुम्ही धारावीला समजू शकला नाहीत, तर देशाला समजू शकणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.
 


Web Title: Maharashtra Election 2019 Why pm Modi cm Fadnavis are not talking about economy ask congress leader Rahul Gandhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.