महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात? अजित पवारांना केला फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 15:16 IST2019-11-11T15:08:06+5:302019-11-11T15:16:46+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात? अजित पवारांना केला फोन
मुंबई - मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान, महाशिवआघाडी सत्तेत येण्याचे संकेत मिळताच राज्यातील राजकीय समीकरणेही वेगाने बदलू लागली आहेत. त्यातच विरोधी पक्षात बसण्याची घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे 7 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतभाजपाला सर्वाधित 105 जागांवर विजय मिळाला होता. मात्र महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून आग्रही भूमिका घेतल्याने भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाशिवआघाडी आकार घेईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. आता तर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपामधील 7 आमदार राष्ट्रवादी काँघ्रेसच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले आहे. या आमदारांनी अजित पवार यांना फोन केला आहे, असे वृत्त न्यूज 18 हिंदीने दिले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचं वाढत वर्चस्व आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या यशानंतर विरोधीपक्षातील काठावर असलेल्या नेत्यांना भाजपची भुरळ पडली होती. भाजपने देखील काठावर असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी मोठी मेगाभरती घेतली होती. मात्र राज्यातील बदललेली राजकीय स्थिती पाहता विकासाचा मुद्दा सांगून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.