महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 10:42 AM2019-11-01T10:42:30+5:302019-11-01T10:51:48+5:30

महाराष्ट्र निवडणूक 2019 : विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असलं, तरी भाजपा आणि शिवसेनेतील रस्सीखेचामुळे राज्यात अद्याप सरकार स्थापन होताना दिसत नाहीए.

Maharashtra Election 2019: Six possible scenarios in formation of government in Maharashtra | महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता

महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता

Next

विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असलं, तरी भाजपा आणि शिवसेनेतील रस्सीखेचामुळे राज्यात अद्याप सरकार स्थापन होताना दिसत नाहीए. शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे आणि भाजपा हे पद सोडायला अजिबात तयार नाही. किंबहुना, आमचं ठरलंय आणि ठरलंय तसंच होईल, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्रिपदाच्या समान वाटणीचं ठरलंच नव्हतं, असं जाहीर केलंय. या विधानावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झालेत आणि युतीतील चर्चेलाच खीळ बसल्याचं चित्र निर्माण झालंय. 

अर्थात, चर्चेचं घोडं अडलं असलं तरी दबावाचं राजकारण दोन्ही बाजूंनी सुरू आहे. सरकार स्थापनेसाठी सगळे पर्याय खुले असल्याचं सांगत दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्रिपद आणि १६ मंत्रिपदं शिवसेनेला सोडण्याचा प्रस्ताव भाजपाने दिल्याचं कळतं. पण कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं सेनेनं म्हटलंय. मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आल्याचं कुणीही समजू नये, असा टोला उद्धव यांनी फडणवीसांना लगावला आहे. दुसरीकडे, या दोघांच्या भांडणाचा लाभ करून घेण्याची संधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते साधताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर, राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यतांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • शक्यता क्रमांक १

भाजपा-शिवसेनेचं मनोमीलन होईल. शिवसेना उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारेल अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. 

  • शक्यता क्रमांक २

शिवसेनेनं सत्तेत सहभागी होण्यास नकार दिल्यास, विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापनेचा दावा करावा लागेल आणि १५ दिवसांत बहुमत सिद्ध करावं लागेल. परंतु, सर्व अपक्षांनी पाठिंबा दिला तरीही १४५ चा आकडा त्यांना गाठता येऊ शकत नाही. अशावेळी, ते राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मागू शकतात. बहुमत चाचणीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहिल्यास बहुमताचा आकडा खाली येईल आणि भाजपा कार्यभाग साधेल. परंतु, अशा परिस्थितीत स्थिर सरकार देणं अत्यंत कठीण असेल.

  • शक्यता क्रमांक ३

शिवसेनेतील आमदारांचा गट फोडून भाजपा बहुमत सिद्ध करू शकते. 

  • शक्यता क्रमांक ४

देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करू शकले नाहीत, तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करू शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होतील किंवा बाहेरून पाठिंबा देतील. 

Shiv Sena and NCP Will make alliance to keep BJP out of power? | भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी? 

  • शक्यता क्रमांक ५

राष्ट्रवादी काँग्रेस आपले ५४ आमदार आणि काँग्रसचे 44 आमदार या जोरावर सरकार स्थापन करेल आणि शिवसेना त्यांना बाहेरून पाठिंबा देईल. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं जाईल. 

  • शक्यता क्रमांक ६

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यापैकी कुणीही सरकार स्थापन करू शकलं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल आणि सर्वाधिकार राज्यपालांना मिळतील. भाजपासाठी ती मोठी नामुष्की असेल. पण हा पर्याय त्यांच्या पथ्यावर पडणाराही आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार; ही तर जनतेची इच्छा''

महाराष्ट्र निवडणूक 2019: अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो; संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणाला?

ठाकरे-फडणवीसांमध्ये तणाव; चर्चेला खीळ, सत्तावाटपाचा पेच कायम

पाच वर्षे सत्ता सांभाळूनही मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर मग कधी मिळणार?

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी? 

 

Web Title: Maharashtra Election 2019: Six possible scenarios in formation of government in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.