Maharashtra Election 2019: 'It is disgraceful to deprive new generation of Chhatrapati Shivaji from history' Says Jyotiraditya Scindia | Maharashtra Election 2019: 'नव्या पिढीला छत्रपती शिवरायांच्या इतिहासापासून वंचित ठेवणं हे संतापजनक'
Maharashtra Election 2019: 'नव्या पिढीला छत्रपती शिवरायांच्या इतिहासापासून वंचित ठेवणं हे संतापजनक'

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला त्यावरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. नव्या पिढीला छत्रपती शिवरायांच्या इतिहासापासून वंचित ठेवणं हे संतापजनक आहे अशा शब्दात काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाष्य केलं आहे. 

या प्रकरणावर बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्याचा प्रकार ऐकून दु:ख झालं आणि रागही आला आहे. अशाप्रकारे आपल्या नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि कतृत्वाविषयी वंचित ठेवण्याच काम भाजपा सरकार करतंय. हे फक्त महाराजांबद्दल नाही तर देशाच्या इतिहासासाठी निंदणीय प्रकार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच या प्रकारावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

दरम्यान, यांचं धाडसच कसं झालं? मी 'केंद्रीय शिक्षण मंडळाकडून' शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जावा म्हणून प्रयत्न करतोय, अनेकदा केंद्रीय शालेय शिक्षण मंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली आहे. देशभर महाराजांचं कर्तृत्व पोचावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रीयांची व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असताना, महाराष्ट्रातच उलटी गंगा वाहावी? ही आगळीक अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दात छत्रपती संभाजी महाराजांनी इशारा दिला आहे. 

महाराष्ट्राची संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरुवात केली. या मंडळाने यंदा पहिली ते चौथीच्या पुस्तकाची छपाई केली आहे. त्यातून ही बाब समोर आली. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर अनेक सरकार बदलली मात्र पुस्तकातील अभ्यासक्रमात छ.शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला होता. 


Web Title: Maharashtra Election 2019: 'It is disgraceful to deprive new generation of Chhatrapati Shivaji from history' Says Jyotiraditya Scindia
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.