Maharashtra Election 2019: Devendra fadnavis Dream Project Samruddhi Mahamarg and Metro work in Maharashtra | महाराष्ट्राला 'समृद्धी'कडे नेणारा महामार्ग ठरू शकतो देवेंद्र फडणवीसांसाठी 'राजमार्ग'  
महाराष्ट्राला 'समृद्धी'कडे नेणारा महामार्ग ठरू शकतो देवेंद्र फडणवीसांसाठी 'राजमार्ग'  

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले अनेक निर्णय राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेत.मेट्रोमार्गांचं जाळं, तसेच समृद्धी महामार्ग हे त्याचे उदाहरण म्हणता येईल. मुंबई आणि नागपूरमधील प्रवास 8 तासांत करणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता प्रचार जोर पकडू लागला आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेची महायुती आणि दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी यांनी कंबर कसली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी भाजपा आणि महायुतीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. सलग पाच वर्षे राज्याचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले अनेक निर्णय राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेत. त्यापैकी दळणवळणाच्या सुविधांबाबत घेतलेल्या निर्णयांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. या निर्णयांचा या निवडणुकीत फडणवीस आणि भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे. 

कुठल्याही देशाच्या किंवा राज्याच्या विकासामध्ये दळणवळणाच्या सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे रस्तेबांधणी, सार्वजनिक वाहतूक सेवा यांच्या निर्मितीस प्रोत्साहन देत असतात. देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबतचे महत्त्व ओळखून राज्यात रस्तेबांधणी आणि सार्वजनिक वाहतूक सेवांच्या उभारणीला प्राधान्य दिले. सध्या मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये आकारास येत असलेले मेट्रोमार्गांचं जाळं तसेच समृद्धी महामार्ग हे त्याचे उदाहरण म्हणता येईल. 

देशात सर्वात वेगाने शहरीकरण होत असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक खूप वरचा आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांवरील ताण वाढत आहे. या शहरांची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने येथील वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे या शहरांचा होत असलेला विस्तार आणि येथील वाहतुकीवर येत असलेला ताण याचा विचार करून मुंबईसह राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारण्याचा धोरणात्मक निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. विशेष बाब म्हणजे मेट्रोचे काम हे कोणत्याही दफ्तर दिरंगाईविना झटपट सुरू झाले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरमधील मेट्रोचे काम वेगाने पूर्णत्वास जात आहे. 

मुंबईसारख्या शहराचा विचार केल्यास देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व दिसून येते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतूक, तसेच इतर रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ट्रॅफीक जॅममुळे रोज हजारो मनुष्य तास वाया जात आहेत. शिवाय प्रवासाच्या दगदगीचाही शहरातील माणसांवर विपरित परिणाम होत आहे. मात्र आता मेट्रो सुरू झाल्यानंतर यापैकी काही समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्याबरोबरच रस्ते वाहतुकीवरचाही ताण कमी होणार आहे. 

गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने पूर्णत्वाच्या दिशेने नेलेला अजून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. मुंबई-नागपूर  समृद्धी महामार्ग हा राज्यातील दळणवळणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर त्याला विविध कारणांमुळे मोठा विरोध झाला होता. मात्र फडणवीस यांनी अत्यंत संयमीपणे या मार्गाली अडथळे दूर करण्यात यश मिळवले. तसेच महामार्गासाठी आवश्यक जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रियाही शांततेत पार पाडली.  या मार्गामुळे मुंबई आणि नागपूर या राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील अंतर 112 किमींनी कमी होणार आहे. तसेच मुंबई आणि नागपूरमधील प्रवास 8 तासांत करणे शक्य होणार आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणारा हा मार्ग, कृषी आणि व्यापाराच्या बाबतीत मुंबई आणि विदर्भाला जोडणारा दुवा ठरेल.


Web Title: Maharashtra Election 2019: Devendra fadnavis Dream Project Samruddhi Mahamarg and Metro work in Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.