Maharashtra Election 2019 : BJP should see declaration of 2014, jayant patil critics on sankalp patra 2019 | Maharashtra Election 2019 : भाजपाने 2014 चा जाहीरनामा पाहायला हवा, 'संकल्पपत्रा'वरुन राष्ट्रवादीचा टोला
Maharashtra Election 2019 : भाजपाने 2014 चा जाहीरनामा पाहायला हवा, 'संकल्पपत्रा'वरुन राष्ट्रवादीचा टोला

मुंबई - भाजपाने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिद्ध केला आहे. भाजपाच्या या जाहीरनाम्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला. भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान आपलाच प्रसिद्ध केलेला 2014 चा जाहीरनामा पहायला हवा होता. 2019 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने ही 2019 सालीच दिलेली आहेत. ही आश्वासने पूर्ण का झाली नाहीत, याचेही उत्तर याच जाहीरनाम्यात भाजपने देणे अपेक्षित होते, असेही जयंत पाटील म्हणाले.

या जाहीरनाम्यात सुरुवातीलाच भाजपाने कलम 370 चा उल्लेख केलेला आहे. एकंदरच काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील निवडणुका जिंकण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न कायम आहे. कलम 370 ऐवजी महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भविष्यासाठी हा पक्ष काय करणार आहे याचे उत्तर या जाहीरनाम्यातून मिळाले असते तर राज्यातील जनतेने किमान हा जाहीरनामा वाचला तरी असता अशी टिकाही पाटील यांनी केली. मी हा जाहीरनामा संपूर्ण वाचला मात्र या जाहीरनाम्यात राज्याच्या सर्वसमावेशी, शाश्वत व संपूर्ण विकासाचे कोणतेही सूत्र अथवा मॉडेल नाही. बहुधा आपण पुन्हा सत्तेत येणार नाही याची खात्री भाजपला झालेली दिसते म्हणून आश्वासनांची पोकळ जंत्रीच या जाहीरनाम्यात भाजपाने दिलेली आहे, असे वाभाडेही जयंत पाटील यांनी काढले आहेत.

या जाहीरनाम्यात दिलेली अनेक आश्वासने केवळ एका वर्षातही पूर्ण करणे शक्य आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्षे सत्ता हातात असतानादेखील ही आश्वासने का पूर्ण केली नाहीत याचा जाब महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांना नक्की विचारेल. 2014 मध्ये भाजपच्या जाहीरनाम्यात अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण करण्याचा उल्लेख होता. सन 2019 जाहीरनाम्यातदेखील हाच उल्लेख कायम असून या दोन्ही स्मारकांची पहिली वीट सुद्धा रचलेली नाही. यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने ते किती गांभीर्याने पाळतात हे स्पष्ट होते, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019 : BJP should see declaration of 2014, jayant patil critics on sankalp patra 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.